अहमदाबाद | आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 मधील पहिला सामना हा 5 ऑक्टोबर रोजी खेळवण्यात येणार आहे. वर्ल्ड कपमधील सलामीचा सामना हा 2019 च्या वर्ल्ड कप अंतिम फेरीतील इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात होणार आहे. हा सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहे. या सामन्याला दुपारी 2 वाजता सुरुवात होणार आहे. तर 1 वाजून 30 मिनिटांनी टॉस होणार आहे. या पहिल्या सामन्यासाठी इंग्लंड आणि न्यूझीलंड दोन्ही संघ सज्ज आहेत.या वर्ल्ड कपच्या पूर्वसंध्येला एकूण 10 संघांचे 10 कर्णधार एकत्र जमले. सर्व कर्णधारांनी एकत्र फोटोशूट केलं.
या सलामीच्या सामन्याआधी इंग्लंड क्रिकेट टीमसाठी वाईट बातमी समोर आली आहे. इंग्लंडचा कॅप्टन जोस बटलर याने या सामन्याच्या पूर्वसंध्येला चाहत्यांसोबत वाईट बातमी शेअर केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पहिल्या सामन्यात इंग्लंडचा माजी कर्णधार बेन स्टोक्स खेळणार नसल्याचं कॅप्टन जोस बटलर याने जाहीर केलंय. त्यामुळे इंग्लंडला पहिल्याच सामन्याआधी मोठा धक्का लागला आहे. बेन स्टोक्स याला बांगलादेश विरुद्धच्या सराव सामन्यादरम्यान दुखापत झाली होती.
इंग्लंडने 2019 च्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडवर मात करत वर्ल्ड कप जिंकला होता. तेव्हा बेन स्टोक्स याने इंग्लंडला वर्ल्ड कप जिंकून देण्यात निर्णायक भूमिका बजावली होती. त्यानंतर स्टोक्सने 2022 रोजी एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. मात्र 2023 च्या वर्ल्ड कपसाठी बेन स्टोक्स याने निवृत्तीचा निर्णय मागे घेत इंग्लंडसाठी मैदानात उतरला. आता वर्ल्ड कपच्या तोंडावर स्टोक्सला दुखापत झालीय. स्टोक्सला झालेली दुखापत किती गंभीर आहे याबाबतची माहिती अजून देण्यात आलेली नाही. तसेच त्याला या दुखापतीतून सावरण्यात किती वेळ लागेल, याबाबतही काही स्पष्ट केलं नाहीये.
बेन स्टोक्स पहिल्या सामन्याला मुकणार
Ben Stokes likely to miss the opening match of World Cup tomorrow against New Zealand.
Harry Brook could play if Stokes misses out. (Daily Mail). pic.twitter.com/Y93ZD4eoB6
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) October 4, 2023
न्यूझीलंड टीम | केन विल्यमसन (कॅप्टन), ट्रेंट बोल्ट, मार्क चॅपमन, डेव्हॉन कॉनवे, लॉकी फर्ग्युसन, मॅट हेन्री, टॉम लॅथम, डॅरिल मिशेल, जिमी नीशम, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, मिच सँटनर, ईश सोधी, टिम साउथी आणि विल यंग.
इंग्लंड टीम | जोस बटलर (कॅप्टन), मोईन अली, गुस ऍटकिन्सन, जॉनी बेअरस्टो, सॅम कुरन, लियाम लिव्हिंगस्टोन, डेविड मलान, आदिल रशीद, जो रूट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स, रीस टोपली, डेव्हिड विली, मार्क वुड आणि ख्रिस वोक्स.