ENG vs AFG | अफगाणिस्तानच्या विजयाचा भारतीय सूत्रधार, हा दिग्गज पडद्यामागचा कलाकार

| Updated on: Oct 16, 2023 | 1:42 AM

Afghanistan Cricket Team | अफगाणिस्ताने इंग्लंडला 69 धावांनी पराभूत करत चारी मुंड्या चित केलं. अफगाणिस्तानच्या विजयात भारतीय दिग्गजाचं विशेष योगदान राहिलं आहे.

ENG vs AFG | अफगाणिस्तानच्या विजयाचा भारतीय सूत्रधार, हा दिग्गज पडद्यामागचा कलाकार
Follow us on

नवी दिल्ली | हशमतुल्लाह शाहिदी याच्या नेतृत्वात अफगाणिस्तान क्रिकेट टीमने आयसीसी वनडे वर्ल्ड कपमध्ये 8 वर्षांची प्रतिक्षा संपवली. अफगाणिस्तानने आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 मध्ये इंग्लंडचा धुव्वा उडवत इतिहास रचला. अफगाणिस्तानने इंग्लंडवर 69 धावांनी विजय मिळवला. अफगाणिस्तानने वर्ल्ड कप 2015 मध्ये स्कॉटलँडला पराभूत करत पहिलावहिला विजय मिळवला. त्यानंतर आता इंग्लंडवर मात करत दुसऱ्या विजयाची नोंद केली. अफगाणिस्तानला वर्ल्ड कपमध्ये 8 वर्षानंतर विजयी करण्यात जितकी मेहनत खेळाडूंची आहे तितकीच एका भारतीय दिग्गजाची आहे. तो पडद्यामागचा कलाकार कोण आहे, हे आपण जाणून घेऊयात.

अफगाणिस्तानला वर्ल्ड कपमध्ये इंग्लंड विरुद्ध विजय सहजासहजी मिळालेला नाही. अफगाणिस्तानच्या विजयामागे अनेक वर्षांची मेहनत, परिश्रम आणि सातत्य आहे. अफगाणिस्तान टीमने कमी काळात प्रतिकूल परिस्थितीत क्रिकेटमध्ये मोठी भरारी मारली आहे. आता यंदा अफगाणिस्तानला वर्ल्ड कपमध्ये 8 वर्षांनी मिळालेल्या विजयामागे टीम इंडियाचा माजी दिग्गज अजय जडेजा याचाही खारीचा वाट आहे. तो कसा हे समजून घेऊयात.

अजयमुळे अफगाणिस्तानचा विजय

अजय जडेजा हे अफगाणिस्तान क्रिकेट टीमचे मेन्टॉर आहेत. अजय जडेजाची वर्ल्ड कपसाठी मेन्टॉर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. भारतात होत असलेला वर्ल्ड कप पाहून अफगाणिस्तान परफेक्ट आणि अचूक निशाणा साधत आपल्या टीमसाठी योग्य आणि अनुभवी व्यक्तीची निवड केली आहे. अजय जडेजा यांना क्रिकेटचा प्रदीर्घ असा अनुभव आहे. तसेच भारतातील प्रत्येक खेळपट्टीची खडानखडा माहिती त्यांना आहे. अजय जडेजा यांच्या अनुभवाचा फायदा निश्चितच अफगाणिस्ताना टीमला या विजयातून झालाय, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

नेट्समध्ये जोरदार सराव

अजय जडेजा अफगाणिस्तानच्या खेळाडूंसोबत नेट्समध्ये हजर असतात. सरावादरम्यान काय करावं, काय करावं, काय टाळावं, हे बिनचूक पद्धतीने अफगाणि खेळाडूंना सांगतात. अजय जडेजा यांची मेन्टॉर म्हणून नियुक्ती करण्यात आल्याची माहिती अफगाणिस्तान क्रिकेटने 2 ऑक्टोबरला दिली. त्यानंतर अवघ्या 13 दिवसांमध्ये अजय जडेजा यांनी अफगाणिस्तानला केलेलं मार्गदर्शन हे इंग्लंड विरुद्ध विजयात रुपांतरीत झालं.

अजय जडेजा यांची क्रिकेट कारकीर्द

अजय जडेजा सचिन तेंडुलकर याच्यासोबत टीम इंडियासाठी 1996 चा वनडे वर्ल्ड कप खेळले आहेत. अजय जडेजा याने 196 वनडे आणि 15 कसोटी सामन्यांमध्ये टीम इंडियाचं प्रतिनिधित्व केलं आहे. अजय जडेजा याने वनडेमध्ये 6 शतकांच्या मदतीने 5 हजार 359 धावा केल्या आहेत. तर टेस्टमध्ये 576 धावा केल्या आहेत.

इंग्लंड प्लेईंग ईलेव्हन | जोस बटलर (कॅप्टन आणि विकेटकीपर), जॉनी बेअरस्टो, डेविड मलान, जो रूट, हॅरी ब्रूक, लियाम लिव्हिंगस्टोन, सॅम करन, ख्रिस वोक्स, आदिल रशीद, मार्क वुड आणि रीस टोपले.

अफगाणिस्तान प्लेईंग ईलेव्हन | हशमतुल्ला शाहिदी (कॅप्टन), रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), इब्राहिम झद्रान, रहमत शाह, मोहम्मद नबी, इक्रम अलीखिल, अजमातुल्ला उमरझाई, रशीद खान, मुजीब उर रहमान, नवीन-उल-हक आणि फजलहक फारुकी.