मुंबई | आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 आधी सर्वच 10 संघ हे सराव सामने खेळत आहेत. टीम इंडियाचा पहिला सराव सामना हा इंग्लंड विरुद्ध होता. मात्र हा सामना पावसाच्या व्यत्ययामुळे अखेर नाईलाजाने रद्द करावा लागला. त्यानंतर आता टीम इंडियाचा दुसरा आणि अखेरचा सराव सामना हा 3 ऑक्टोबर रोजी होणार आहे. टीम इंडियासमोर या सामन्यात नेदरलँड्सचं आव्हान असणार आहे. हा सामना तिरुवनंतपुरम इथेली ग्रीनफिल्ड स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. तर दुसऱ्या बाजूला या सामन्याआधी विराट कोहली याच्याबाबत मोठी बातमी समोर आली आहे.
विराट कोहली याने सामन्याच्या काही तासांआधी टीम इंडियाची साथ सोडली आहे. विराट मुंबईला परतला आहे. विराट काही कारणांमुळे मुंबईला परतल्याचं म्हटलं जात आहे. विराटने अचानक टीम इंडियाची साथ सोडून मुंबईला का परतला, विराटला नक्की काही झालंय का, हे आणि असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित केले जात आहे. विराटने नक्की मुंबईला का परतलाय, हे आपण जाणून घेऊयात.
टीम इंडियाचा पहिला सराव सामना हा गुवाहाटीत होता. त्यामुळे दुसऱ्या सामन्यासाठी टीम इंडियाचे इतर खेळाडू हे गुवाहाटीवरुन तिरुवनंतपुरमच्या प्रवासाला निघाले. तर विराट काही तिरुवनंतपुरमला गेला नाही. विराटने टीम मॅनेजमेंटची परवानगी घेतली. विराट परवानगी मिळाल्यानंतर गुवाहाटीवरुन थेट मुंबईला रवाना झाला. विराटने वैयक्तिक कारणामुळे मुंबईला परतला आहे. मात्र विराट सोमवारी संध्याकाळपर्यंत तिरुवनंतरपुरम इथे पोहचून टीम इंडियासोबत जोडला जाईल, अशी माहिती क्रिकबझच्या रिपोर्टमध्ये देण्यात आली आहे.
वेदरकॉमनुसार, मंगळवारी 3 ऑक्टोबर रोजी तिरुवनंतपुरममध्ये कमाल तापमान हे 29 डिग्री तर किमान 24 डिग्री सेल्सियस इतकं असेल. या सामन्यादरम्यान पाऊस होण्याची 90 टक्के शक्यता आहे. तसेच ढगाळ वातावरण असेल. त्यामुळे या सामन्यावर पावसाचं सावट आहे.
आयसीसी वनडे वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया | रोहित शर्मा (कॅप्टन), हार्दिक पांड्या (उपकर्णधार ), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, रविचंद्रन अश्विन, इशान किशन आणि सूर्यकुमार यादव.