मुंबई | टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाकडून तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात 21 धावांनी पराभव स्विकारावा लागला. ऑस्ट्रेलियाने विजयासाठी 270 धावांचे आव्हान दिले होते. मात्र टीम इंडियाला ऑलआऊट 249 धावा करता आल्या. ऑस्ट्रेलियाने या विजयासह ही मालिका 2-1 फरकाने जिंकली. टीम इंडियाचा हा भारतातील 2019 नंतरचा पहिलाच मालिका पराभव ठरला. याआधीही ऑस्ट्रेलियानेच टीम इंडियाला 2019 मध्ये 3-2 च्या फरकाने पराभूत केलं होतं. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या पराभवानंतर टीम मॅनेजमेंटवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. तसेच आगामी एकदिवसीय वर्ल्ड कपच्या पार्श्वभूमीवर खेळाडूंची निराशाजनक कामगिरी ही टीम इंडियासाठी धोक्याची घंटा आहे.
टीम इंडियाने ऑस्ट्रेलिया विरुद्ध मालिका गमावली. त्यानंतर आता टीम इंडिया आगामी वर्ल्ड कपआधी वेस्टइंडिज आणि पुन्हा ऑस्ट्रेलिया विरुद्ध एकदिवसीय मालिका खेळणार आहे. या दरम्यान आशिया कप स्पर्धेचं आयोजनही होणार आहे. त्यामुळे विंडिंज, आशिया कप आणि ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकांकडे वर्ल्ड कपची रंगीत तालिम म्हणून पाहिलं जात आहे.
ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या या मालिकेत मुंबईकर आणि टी 20 स्पेशालिस्ट सूर्यकुमार यादव याची श्रेयस अय्यर याच्या जागी प्लेइंग इलेव्हनमध्ये निवड करण्यात आली. मात्र सूर्याला या संधीचं सोनं करता आली नाही. सूर्याने माती केली. सूर्या सपशेल अपयशी ठरला. सूर्याला तिन्ही सामन्यात भोपळाही फोडता आला नाही. सूर्या तिन्ही सामन्यात पहिल्याच बॉलवर आऊट झाला. त्याच्यामुळे सूर्यावर टीकेची झोड उठत आहे. यामुळे सूर्याला खूप संधी दिल्या, आता उपेक्षित संजू सॅमसन याला संधी देण्यात यावी, अशी मागणी नेटकऱ्यांची आहे.
संजूला आगामी वनडे वर्ल्ड कपमध्ये संधी मिळण्याची 2 प्रमुख कारणं आहेत. एक म्हणजे अपयशी ठरलेला सूर्यकुमार यादव. सूर्या टी 20 क्रिकेटमध्ये जितका खतरनाक आहे तितकाच तो वनडेत फ्लॉप आहे हे त्याच्या आकडेवारीवरुन दिसतं. तर दुसरं कारण म्हणजे संजू याचं विकेटकीपर असणं. एकाच खेळाडूत 2 पर्याय आहेत. संजूचं विकेटकीपिंगचं स्कील यामुळे तो सूर्याच्या तुलनेत उजवा ठरतोय. यामुळे संजूला वर्ल्ड कपसाठी संधी मिळू शकते.
दरम्यान वर्ल्ड कपला अजून बराच वेळ आहे. त्यामुळे त्याआधीच्या मालिकांसाठी टीम मॅनेजमेंट सूर्याला संधी देऊन तो त्या संधीचा फायदा घेणार का, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असेल. तसेच संजूची आता जरी हवा असली, तरी त्याचा मोक्याच्या क्षणी टीम इंडियात समावेश केला जाणार का, हे येत्या काही महिन्यातच स्पष्ट होणार आहे.