T20 WC 2024 : टीम इंडिया वर्ल्ड कपसाठी केव्हा रवाना होणार?

| Updated on: May 15, 2024 | 10:16 PM

Indian Cricket Team : टीम इंडिया रोहित शर्मा याच्या नेतृत्वात टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेत खेळणार आहे. तसेच हार्दिक पंड्या टीम इंडियाचं उपकर्णधारपद सांभाळणार आहे.

T20 WC 2024 : टीम इंडिया वर्ल्ड कपसाठी केव्हा रवाना होणार?
t20i world cup 2024
Follow us on

पाकिस्तानचा अपवाद वगळता आयसीसी टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेत सहभागी होणाऱ्या 19 संघांनी आपली टीम जाहीर केली आहे. आयसीसी टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेला 2 जूनपासून सुरुवात होणार आहे. तर 29 जून रोजी या नवव्या टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेची सांगता होणार आहे. स्पर्धेचं आयोजन हे यूएसए आणि वेस्ट इंडिजमध्ये करण्यात आलं आहे. आयपीएलमध्ये खेळणारे परदेशी खेळाडू हे मायदेशी परतले आहेत. आता टीम इंडिया वर्ल्ड कपसाठी केव्हा रवाना होणार? साखळी फेरीआधी किती सराव सामने खेळणार? याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.

टी 20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात 15 मुख्य आणि 4 राखीव अशा एकूण 19 खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. टीम इंडियासह कोचिंग स्टाफ, फिजीओ आणि इतर संबंधित टीमही सोबत असणार आहे. मात्र हे सर्व एकत्र जाणार नसल्याचं समोर आलं आहे. टीम इंडिया एकूण 2 तुकड्यांमध्ये रवाना होणार असल्याचं समजतंय. मिळालेल्या माहितीनुसार, टीम इंडियाची पहिली तुकडी ही 25 मे रोजी रवाना होणार आहे. तर दुसरी तुकडी 26 मे रोजी उड्डाण भरणार आहे. याच 26 मे रोजी आयपीएलमधील अंतिम सामना होणार आहे.

टीम इंडियाचं वर्ल्ड कप वेळापत्रक

टीम इंडिया वर्ल्ड कप मोहिमेला सुरुवात करण्याआधी एकूण 2 सराव सामने खेळणार असल्याचं म्हटलं जात आहे. हे सामने फ्लोरिडा येथे होणार असल्याची माहिती आहे. तर त्यानंतर टीम इंडिया आपल्या वर्ल्ड कप मोहिमेची सुरुवात 5 जूनपासून आयर्लंड विरुद्ध करेल. त्यानंतर टीम इंडिया पुढील सामना हा 9 जून रोजी पाकिस्तान विरुद्ध खेळणार आहे. तिसऱ्या सामन्यात 12 जून रोजी यजमान यूएसएचं आव्हान असणार आहे. तर चौथा आणि अखेरचा सामना हा कॅनेडा विरुद्ध होणार आहे.

टी 20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल , अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.

राखीव खेळाडू : शुभमन गिल, रिंकू सिंग, खलील अहमद आणि आवेश खान.