लंडन | टीम इंडियाच्या क्रिकेट चाहत्यांना गेल्या काही महिन्यांपासून ज्या दिवसाची प्रतिक्षा होती, तो आजचाच दिवस. टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात आजपासून म्हणजेच 7 जूनपासून ते 11 जून पर्यंत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल सामना रंगणार आहे. तर 12 जून हा राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. या सामन्याचं आयोजन हे लंडनमधील द केनिंग्टन ओव्हल इथे करण्यात आलं आहे. सामन्याला दुपारी 3 वाजता सुरुवात होणार आहे. भारतीय क्रिकेट संघाचं नेतृत्व रोहित शर्मा करणार आहे. तर पॅट कमिन्स याच्याकडे ऑस्ट्रेलियाच्या नेतृत्वाची धुरा आहे.
रोहित शर्मा याची आयसीसीच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाचं नेतृत्व करण्याची पहिलीच वेळ आहे. तसेच टीम इंडियाला 2011 पासून एकदाही आयसीसी वर्ल्ड कप जिंकता आलेला नाही. त्यामुळे रोहित शर्मा आपल्या नेतृत्वात टीम इंडियाची गेल्या 12 वर्षांपासूनची प्रतिक्षा संपवणार का, याकडे भारतीय चाहत्यांचं लक्ष लागलेलं आहे.
टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटीतील आकडे आपण पाहुयात. टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात आतापर्यंत एकूण 106 कसोटी सामने खेळवण्यात आले आहेत. ऑस्ट्रेलियाने या 106 सामन्यांपैकी 44 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तर टीम इंडियाने 32 सामन्यात कांगारुंचा धुव्वा उडवला आहे. दोन्ही संघांना 29 सामने ड्रॉ करण्यात यश आले आहे. तर 1 सामना हा टाय झालाय.
ऑस्ट्रेलियाने या 44 पैकी 30 सामने घरच्या मैदानात जिंकले आहेत. तर 14 सामने ऑस्ट्रेलियाबाहेर जिंकले आहेत. तर भारताने 23 देशात आणि 9 परदेशात सामने जिंकले आहेत. त्यामुळे आकडेवारीच्या हिशोबाने ऑस्ट्रेलिया भारतावर वरचढ आहे.
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, इशान किशन (विकेटकीपर), आर. अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, केएस भरत, शार्दुल ठाकुर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव आणि जयदेव उनाडकट.
राखीव खेळाडू | सूर्यकुमार यादव, यशस्वी जयस्वाल आणि मुकेश कुमार
पॅट कमिन्स (कॅप्टन), स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर, स्कॉट बोलँड, ॲलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, मार्कस हॅरिस, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लायन , मिचेल मार्श, टॉड मर्फी, मिचेल स्टार्क आणि मॅथ्यू रेनशॉ.
राखीव खेळाडू | मिचल मार्श आणि मॅथ्यू रेनशॉ.