मुंबई : भारताचा स्टार बॉलर जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे गेल्या अनेक दिवसांपासून क्रिकेटपासून दूर आहे. बुमराहला दुखापतीमुळे आशिया कप आणि टी-20 वर्ल्ड कपलाही मुकला होता. आता चालू असलेल्या बॉर्डर गावसकर मालिकेतही तो फिट नसल्यामुळे त्याला खेळता आलं नाही. यंदा कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामना आणि एकदिवसीय वर्ल्ड कपसाठी त्याला विश्रांती देणं महत्त्वाचं आहे. याच पार्श्वभूमीवर भारताचा माजी खेळाडू आणि समालोचक आकाश चोप्राने मोठं वक्तव्य केलं आहे.
तुम्ही आधी भारतीय खेळाडू आहात आणि मग तुम्ही तुमच्या फ्रँचायझींसाठी खेळता. त्यामुळे बुमराहला काही अस्वस्थ वाटत असेल तर बीसीसीआय हस्तक्षेप करेल आणि फ्रेंचायझीला सांगेल की आम्ही त्याला सोडणार नाही. जर बुमराह जोफ्रा आर्चरसोबत सात सामने खेळला नाहीतर जग संपणार नसल्याचं आकाश चोप्राने म्हटलं आहे.
बुमराह आयपीएलमध्ये पुनरागमन करेल मात्र त्याला पाठीची दुखापत पुन्हा होणार नाही याची खात्री बीसीसीआयने करायला हवी, असं आकाश चोप्राचं म्हणणं आहे. बुमराहला काही सामन्यांसाठी विश्रांती द्यावी, असे बीसीसीआयला वाटलं तर ते तसा निर्णय घेऊ शकतात आणि मुंबई इंडियन्सला बीसीसीआयचं ऐकावं लागणार असल्याचं आकाश चोप्रा म्हणाला. जर बुमराह फिट झाला तर तो कसोटी वर्ल्ड क्रिकेटचा अंतिम सामना खेळण्याआधी जडेजाप्रमाणे एक लाल चेंडूचा सामन्यासाठी देशांतर्गत क्रिकेट खेळू शकतो, असा सल्लाही आकाश चोप्राने दिला आहे.
दरम्यान, बुमराहला टी 20 वर्ल्ड कप 2022 च्या आधी पाठदुखीच्या त्रास झाला होता. बुमराह तेव्हापासून दुखापतीतून सावरण्यासाठी एनसीएत मेहनत घेतोय. या दरम्यानच्या काळात बुमराहला आणखी एक दुखापत झाली. त्यामुळे बुमराहचं कमबॅक रखडत गेलं. बुमराह अजून राष्ट्रीय क्रिकेट अकादमी बंगळुरु इथे दुखापतीवर मेहनत घेतोय.