मुंबई इंडियन्स फ्रेंचायझीत आयपीएल 2024 स्पर्धेत मोठी उलथापालथ झाली. रोहित शर्मा ऐवजी कर्णधारपदाची धुरा हार्दिक पांड्याची हाती सोपवली गेली. तेव्हापासून रोहित शर्मा फ्रेंचायझी सोडणार असा वावड्या उठल्या आहेत. रोहित शर्मा 2011 पासून मुंबई इंडियन्स फ्रेंचायसीसोबत आहेत. गेली 13 वर्षे त्याने फ्रेंचायझीसोबत घालवली आहेत. तसेच पाचवेळा जेतेपदावर नाव कोरलं आहे. पण असं असताना मागच्या पर्वात हार्दिक पांड्याला ट्रेड विंडोच्या माध्यमातून संघात घेतलं आणि जबाबदारी सोपवली. पण टी20 वर्ल्डकप विजयानंतर सर्वच चित्र बदललं आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडियाने जेतेपदावर नाव कोरलं होतं. आता मुंबई इंडियन्स संघ त्याला रिटेन करणार की रिलीज करणार हे लिलावापूर्वीच स्पष्ट होईल. पण माजी क्रिकेटपटू हरभजन सिंग याने रोहित शर्माबाबत एक भाकीत केलं आहे. जर मुंबई इंडियन्सने रोहित शर्माला रिलीज केलं तर कोणत्या संघाकडून खेळेल सांगितलं आहे.
लीजेंड्स लीग क्रिकेट 2024 स्पर्धेच्या लिलावा दरम्यान हरभजन सिंगने टाइम्स नाउशी बोलताना रोहित शर्माचं भविष्याबाबत सांगितलं आहे. हरभजन सिंगच्या मते, रोहित शर्मा दिल्ली कॅपिटल्स संघासोबत येणार की मुंबई इंडियन्ससोबत राहणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. यावेळी आयपीएल लिलाव खूप चर्चेत राहणार आहे. या लिलावात खूप सारी मोठी नावं असतील आणि कोणत्या संघात जाणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. हरभजनच्या या वक्तव्याचा सरळ सरळ अर्थ असा निघतो की, जर मुंबई इंडियन्सने रिटेन केलं नाही तर दिल्ली कॅपिटल्ससोबत जुळवून घेईल.
दुसरीकडे, हरभजन सिंगला रोहित शर्मासाठी 50 कोटी मोजले जातील का? तेव्हा त्याने मजेशीर उत्तर दिलं. ‘माहिती नाही पण हे पैसे माझ्यासाठी नाहीत. जर रोहित शर्माला मिळाले तर मी त्याला सांगेन की माझा हिस्सा वेगळा कर.’, असं हरभजनसिंग मजेशीरपणे म्हणाला. रोहित शर्मा आणि हरभजन सिंग यांच्यात चांगलं बाँडिंग आहे. दोघंही बराच काळ एकत्र खेळले आहेत. मुंबई इंडियन्सने रिलीज केल्यानंतर हरभजन सिंग धोनीच्या नेतृत्वात चेन्नई सुपर किंग्ससाठी खेळला होता.