टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील सुपर 8 फेरीत धडक मारण्यासाठी संघांमध्ये चढाओढ सुरु झाली आहे. जय पराजयाच्या गणितावर पुढचं सर्व चित्र स्पष्ट होणार आहे. अ गटात भारतासोबत पाकिस्तान, अमेरिका, आयर्लंड आणि कॅनडा हे संघ आहेत. या गटातून भारताने सुरुवातीचे तीन सामने जिंकून सुपर 8 फेरीतील स्थान निश्चित केलं आहे. तर दुसऱ्या संघासाठी अजूनही चार संघांमध्ये चुरस आहे. त्यामुळे या गटातून टॉप संघात उलथापालथ होण्याची शक्यता आहे. मोठा उलटफेर झाल्यास भारताची दुसऱ्या स्थानावर घसरण होऊ शकते. मात्र असं असलं तरी भारतीय संघाला अव्वल संघ म्हणूनच गणलं जाईल. आंतरराष्ट्रीय क्रिकेट मंडळाने क्रमवारीच्या आधारे पहिल्या फेरीसाठी पाच संघांचे चार गट केले आहे. असंच गणित सुपर 8 फेरीसाठी असणार आहे. त्यामुळे एखाद्या संघाने खराब कामगिरी केली तरीही वेळापत्रकात फारसा बदल होणार नाही.
आयसीसी क्रमवारीनुसार, अ गटात भारत हा अव्वल संघ आहे. तर पाकिस्तान, आयर्लंड, कॅनडा आणि अमेरिका हे संघ दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर आहेत. त्यामुळे या गटात भारताची घसरण खालच्या क्रमांकावर झाली तरी अव्वल मानला जाईल. पाकने गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले तरी त्या संघाला दुसऱ्या स्थानावरील संघ म्हणून गणला जाईल.
भारत सुपर 8 फेरीसाठी पात्र ठरला असून 20 जून रोजी अफगाणिस्तानविरुद्ध म्हणजेच क गटातील दुसऱ्या संघासोबत खेळेल. ड गटातील दुसऱ्या संघासोबत भारताचा सामना 22 जूनला आहे. पण अजूनही दुसऱ्या क्रमांकाचा संघ काही ठरलेला नाही. तर या गटातून दक्षिण अफ्रिका संघ पात्र ठरला असून अव्वल स्थानीच राहणार आहे. तर भारताचा 24 जूनचा सामना ऑस्ट्रेलियासोबत असल्याचं निश्चित आहे. ब गटात क्रमवारीनुसार इंग्लंड हा संघ अव्वल स्थानी आहे. जर इंग्लंडचा संघ क्वॉलिफाय होण्यास अपयशी ठरला तर स्कॉटलँड संघाला अव्वल धरलं जाईल.
सुपर 8 फेरीत एकूण दोन गट असणार आहे. या गटात अ आणि ब गटातील टॉप टीम असतील. तर दुसऱ्या गटात क आणि ड गटातील टॉप संघ असतील. हे संघ आपल्यात गटात प्रत्येकी तीन सामने खेळतील. प्रत्येक गटातील अव्वल स्थानी असलेले दोन संघ उपांत्य फेरीत स्थान मिळवतील.