मुंबई : वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात न्यूझीलंडने इंग्लंडला पराभूत केलं. 2019 वनडे वर्ल्डकपच्या अंतिम फेरीत इंग्लंडकडून चौकाराच्या आधारावर पराभव सहन करावा लागला होता. त्यामुळे जेतेपदाचं स्वप्न हुकलं होतं. आता न्यूझीलंडने त्या पराभवाचा वचपा काढला असंच म्हणावं लागेल. इंग्लंडने 9 गडी गमवून विजयासाठी 282 धावांचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान न्यूझीलंडने 1 गडी गमवून 36.2 षटकात पूर्ण केलं. यात डेव्हॉन कॉनव्हे आणि रचिन रविंद्र यांनी चमकदार कामगिरी केली. तसेच इंग्लंडच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडलं.
न्यूझीलंडचा डाव अडखळत झाला. विल यंग शून्यावर बाद झाला. त्यानंतर न्यूझीलंडच्या फलंदाजावर दबाव येईल असं वाटत होतं. मात्र डेवॉन कॉनव्हे आणि रचिन रविंद्र यांनी इंग्लंडच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडलं. डेवॉनने नाबाद 152 आणि रचिन रविंद्र याने नाबाद 123 धावा केल्या. दोघांनी दुसऱ्या गड्यासाठी 273 धावांची भागीदारी केली. इंग्लंडकडून फक्त सॅम करन याला फक्त एक विकेट घेता आली. त्यानंतर एकही गोलंदाज चालला नाही. मार्क वूडही महागडा ठरला त्याने 5 षटकात 55 धावा दिल्या.
Devon Conway (152*) and Rachin Ravindra (123*) guide the team to an opening win in India! Both on @cricketworldcup debut. Scorecard | https://t.co/aNkBrDiAuv #CWC23 pic.twitter.com/pWrLvtCqPP
— BLACKCAPS (@BLACKCAPS) October 5, 2023
न्यूझीलंडने नाणेफेकीचा कौल जिंकत इंग्लंडला फलंदाजीचं आमंत्रण दिलं. जो रूट आणि जोस बटलर सोडून एकही फलंदाज साजेशी कामगिरी करू शकला नाही. जो रूटने 86 चेंडूत 77 धावा आणि जोस बटलरने 42 चेंडूत 43 धावा केल्या. या व्यक्तिरिक्त एकही खेळाडू मोठी धावसंख्या उभारू शकला नाही. न्यूझीलंडकडून मॅट हेन्री याने 3, सँटनरने 2, ग्लेन फिलिप्सने 2, ट्रेंट बोल्टने 1 आणि रचिन रविंद्र याने 1 गडी बाद केला.
इंग्लंड (प्लेइंग इलेव्हन): जॉनी बेयरस्टो, डेविड मलान, जो रूट, हॅरी ब्रूक, जोस बटलर (कर्णधार/विकेटकीपर), लियाम लिव्हिंगस्टोन, मोईन अली, सॅम कुरन, ख्रिस वोक्स, आदिल रशीद, मार्क वुड
न्यूझीलंड (प्लेइंग इलेव्हन): डेव्हॉन कॉनवे, विल यंग, रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, टॉम लॅथम (कर्णधार/विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, मॅट हेन्री, मिचेल सँटनर, जेम्स नीशम, ट्रेंट बोल्ट