कोलंबो | पाकिस्तान आणि टीम इंडिया, 2 सख्खे शेजारी आणि पक्के वैरी. खेळ कोणताही असो, उभयसंघातील सामन्याकडे दोन्ही देशांचं नाही तर क्रीडा विश्वाचं लक्ष असतं. आता आशिया कप आणि त्यानंतर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत हे कडवट प्रतिस्पर्धी आमनेसामने भिडणार आहेत. मात्र त्याआधी रविवारी 23 जुलै रोजी एसीसी मेन्स एमर्जिंग एशिया कप स्पर्धेत पाकिस्तान ए विरुद्ध टीम इंडिया ए यांच्यात आरपारचा सामना होणार आहे. एशिया किंग होण्यासाठी दोन्ही संघात कडवी झुंज पाहायला मिळणार आहे.
टीम इंडिया ए ने शुक्रवारी बांगलादेश ए ला 51 धावांनी विजय मिळवत फायनलमध्ये एन्ट्री मारली. तर त्याआधी पहिल्या सेमी फायनलमध्ये पाकिस्तानने श्रीलंकेचा 60 रन्सने खुर्दा उडवला. पाकिस्तानने साखळी फेरीत 3 पैकी 2 सामन्यात विजय मिळवला. तर टीम इंडिया विरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानला जिंकता आलं नाही. तर टीम इंडियाने साखळी फेरीत तिन्ही सामने जिंकले.
दरम्यान पाकिस्तान टीम इंडिया या स्पर्धेत फायनलआधी साखळी फेरीत 19 जुलैला आमनेसामने आले होते. त्या सामन्यात टीम इंडियाने पाकिस्तानवर 8 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला होता. त्यामुळे आताही अंतिम सामन्यात पाकिस्तानचा सुपडा साफ करण्याचा प्रयत्न टीम इंडियाचा असणार आहे.
दरम्यान टीम इंडिया ए टीमने आजपासून 10 वर्षांपूर्वी पाकिस्तान विरुद्ध सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात 9 विकेट्सने विजय मिळवला होता. पाकिस्तानने विजयसाठी दिलेलं 160 धावांचं आव्हान टीम इंडियाने केएल राहुल याच्या नाबाद 93 धावांच्या जोरावर पूर्ण केलं होतं. आता यश धूल सूर्यकुमार यादव याच्यानंतर टीम इंडियाला 10 वर्षानंतर पाकिस्तानलाच पराभूत करत एशिया किंग करणार का, याकडे क्रिकेट चाहत्यांची बारीक नजर असणार आहे.
पाकिस्तान ए टीम | मोहम्मद हारिस (कॅप्टन आणि विकेटकीपर), सैम अयुब, साहिबजादा फरहान, ओमेर युसूफ, तय्यब ताहिर, कासिम अक्रम, मुबासिर खान, अमद बट, मोहम्मद वसीम जूनियर, सुफियान मुकीम, अर्शद इक्बाल, हसीबुल्ला खान, मेहरान मुमताज आणि कामरान गुलाम.
टीम इंडिया ए | यश धुल (कॅप्टन), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), साई सुदर्शन, अभिषेक शर्मा, निकिन जोस, निशांत सिंधू, रियान पराग, हर्षित राणा, मानव सुथार, राजवर्धन हंगरगेकर, युवराजसिंह डोडिया, प्रभसिमरन सिंग, आकाश सिंग, नितीश पॉल रेड्डी आणि प्रदोष पॉल.