मोहाली | टीम इंडियाने अफगाणिस्तान विरुद्धचा पहिला टी 20 सामना हा 6 विकेट्सने जिंकला. टीम इंडियाने यासह 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. शिवम दुबे याने बॉलिंग आणि बॅटिंगने दुहेरी भूमिका बजावत विजयी योगदान दिलं. शिवमने 1 विकेट घेतली. तसेच 159 धावांचा पाठलाग करताना नाबाद 60 धावा केल्या. रोहितने आपल्या नेतृत्वात टीम इंडियाला 14 महिन्यांनी टी 20 विजय मिळवून दिला. मात्र रोहितचा एक निर्णय चुकल्याचं क्रिकेट चाहते म्हणत आहेत. रोहितचं नक्की काय चुकलं, हे आपण जाणून घेऊयात.
कॅप्टन रोहितने बॅटिंगसाठी आणखी पर्याय म्हणून चायनामॅन गोलंदाज कुलदीप यादवऐवजी वॉशिंग्टन सुंदर याला संधी दिली. मात्र वॉशिंग्टनला बॉलिंगने काही काही खास करता आलं नाही. सुंदरने 3 ओव्हरमध्ये 27 धावा लुटवल्या. त्याला एकही विकेट घेता आली नाही. त्यामुळे रोहितचा कुलदीपऐवजी सुंदरला खेळवण्याचा निर्णय चुकला, असं चाहते म्हणत आहेत.
सुंदरनुसार कुलदीप निश्चित बॅटिंग करता येत नाही. मात्र कुलदीपसारखी बॉलिंग करण्यात सुंदर पारंगत नाही. इतकंच नाही, तर सुंदरला गेल्या 6 टी 20 सामन्यात फक्त 2 विकेट्सच घेता आल्या आहेत. त्यातही 5 सामन्यात सुंदरला एकही विकेट मिळाली नाही.
दरम्यान या टी 20 मालिकेतील दुसरा सामना हा 14 जानेवारी रोजी होणार आहे. या सामन्याचं आयोजन हे मध्यप्रदेश येथील इंदूरमधील होळकर स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. टीम इंडिया या 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. त्यामुळे टीम इंडियाला दुसरा सामना जिंकून मालिकाही जिंकण्याची संधी आहे.
अफगाणिस्तान विरुद्धच्या टी 20 सीरिजसाठी टीम इंडिया | रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, तिलक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग , आवेश खान आणि मुकेश कुमार.
अफगाणिस्तान टीम | इब्राहिम झद्रान (कॅप्टन), रहमानुल्लाह गुरबाज (विकेटकीपर), इकराम अलीखिल (विकेटकीपर), हजरतुल्लाह झझाई, रहमत शाह, नजीबुल्लाह जादरान, मोहम्मद नबी, करीम जनत, अजमुल्लाह उमरजई, शराफुद्दीन अशरफ, मुजीब उर रहमान, फजल हक फारूकी, फरीद अहमद, नवीन उल हक, नूर अहमद, मोहम्मद सलीम, कैस अहमद, गुलबदीन नायब आणि राशिद खान.