मुंबई : भारत विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यात पहिला टी20 सामना सुरु आहे. तीन सामन्यांच्या मालिकेवर पुढचं चित्र स्पष्ट होणार आहे. टी20 वर्ल्डकप 2024 च्या दृष्टीने ही मालिका खूपच महत्त्वाची आहे. त्यामुळे कोणता खेळाडू चांगली कामगिरी करतो आणि कोण फेल ठरतो यावरून निवड समितीला अंदाज बांधता येणार आहे. कारण वर्ल्डकप स्पर्धेपूर्वीची ही शेवटची आंतरराष्ट्रीय टी20 मालिका आहे. त्यानंतर आयपीएल स्पर्धा असून त्यातून खेळाडूंची निवड करणं निवड समितीला खूपच कठीण जाईल. त्यामुळे या मालिकेचं महत्त्व वाढलं आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल जिंकत रोहित शर्माने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यावेळी रोहित शर्माने 14 महिन्यानंतर कमबॅक केलं आहे. यावेळी कर्णधार रोहित शर्माने आपल्या भावना व्यक्त केल्या.
रोहित शर्माने नाणेफेकीचा कौल जिंकत सांगितलं की, “आम्ही पहिल्यांदा गोलंदाजी करू. या निर्णयामागे कोणतंही कारण नाही. खेळपट्टी चांगली असून फारशी बदलत नाही. तीन सामन्यांमधून बरेच काही मिळवायचे आहे. आमच्यासमोर विश्वचषक, आयपीएल स्पर्धा आहे. पण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आम्ही काही गोष्टी साध्य करण्याचा प्रयत्न करू. मी राहुल द्रविडशी याबाबत चर्चा केली आहे. पुढे जाऊन टीम म्हणून काय केले पाहिजे. आम्ही तेच करण्याचा प्रयत्न करू. परंतु जिंकणे ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे.”
भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, टिळक वर्मा, शिवम दुबे, जितेश शर्मा (विकेटकीपर), रिंकू सिंग, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार
अफगाणिस्तान (प्लेइंग इलेव्हन): रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), इब्राहिम झद्रान (कर्णधार), रहमत शाह, अजमतुल्ला उमरझाई, मोहम्मद नबी, नजीबुल्ला झदरन, करीम जनात, गुलबदिन नायब, फजलहक फारुकी, नवीन-उल-हक, मुजीब उर रहमान
टी20 वर्ल्डकप स्पर्धा 1 जूनपासून 29 जूनपर्यंत आहे. यात पाच पाच संघांचे चार गट असून टॉपला दोन असलेल्या संघ सुपर 8 मध्ये प्रवेश करतील. टीम इंडियाच्या गटात पाकिस्तानचा संघ असून 9 जूनला सामना होणार आहे. असं सर्व गणित असताना रोहित शर्माकडे सध्या कर्णधारपद सोपवणं भविष्याची वाटचाल आहे असंच म्हणावं लागेल.