IND vs AFG : रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचं टी20 वर्ल्डकपसाठी कमबॅक! अफगाणिस्तानविरुद्धची मालिका खेळणं जवळपास निश्चित

| Updated on: Jan 06, 2024 | 9:10 PM

टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धेसाठी आता अवघ्या पाच महिन्यांचा अवधी शिल्लक राहिला आहे. या स्पर्धेपूर्वी टीम इंडियाची रंगीत तालिम सुरु झाली आहे. अफगाणिस्तानविरुद्धच्या टी20 मालिकेकडे याच दृष्टीने पाहिलं जात आहे. या मालिकेसाठी विराट कोहली आणि रोहित शर्मा यांची निवड होणं जवळपास निश्चित झालं आहे. त्यामुळे त्यांचा वर्ल्डकपच्या दिशेने प्रवास सुरु झाला आहे असंच म्हणावं लागेल.

IND vs AFG : रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचं टी20 वर्ल्डकपसाठी कमबॅक! अफगाणिस्तानविरुद्धची मालिका खेळणं जवळपास निश्चित
IND vs AFG : रोहित शर्मा आणि विराट कोहलीची टी20 वर्ल्डकपसाठी वाट मोकळी! अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेत खेळण्याची शक्यता
Follow us on

मुंबई : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात तीन सामन्यांची टी20 मालिका सुरु होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना 11 जानेवारीला होणार आहे. या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा  करण्याबाबत बीसीसीआय चालढकलपणा करत आहे. अफगाणिस्तानचा संघ जाहीर झाल्यानंतरही अजून वेट अँड वॉचची भूमिका आहे. यावरून रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचं कमबॅक होणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे. कारण बीसीसीआयच्या जवळच्या सूत्रांचा दाखला देत याबाबतच्या बातम्या समोर येत आहेत. मागच्या टी20 वर्ल्डकप 2022 पासून हे दोघंही आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले नव्हते. कसोटी आणि वनडे क्रिकेटवर या दोघांनी लक्ष केंद्रीत केलं होतं. पण टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धेपूर्वी या दोघांचं संघात कमबॅक होणार असल्याचं सांगितलं जात आहे. या दोघांचा फॉर्म पाहता त्यांची निवड करणं सिलेक्शन समितीला भाग पडलं असंच म्हणावं लागेल. तसेच महत्त्वाचे खेळाडू दुखापतग्रस्त असल्याने पर्यायही नसल्याचंही काही जणांचं म्हणणं आहे.

वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेत रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडिया खेळली होती. टीम इंडियाने अंतिम फेरीपर्यंत धडक मारली होती. दुसरीकडे, गेल्या दीड वर्षापासून हार्दिक पांड्याकडे टी20 चं नेतृत्व होतं. पण दुखापतीमुळे संघाबाहेर गेल्याने सूर्यकुमार यादवने संघाची धुरा सांभाळली होती. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी त्याने नेतृत्व केलं होतं. पण दक्षिण अफ्रिका दौऱ्यात दुखापत झाल्याने सूर्यकुमार यादवही संघाबाहेर आहे. त्यामुळे पुन्हा एकदा नेतृत्व रोहित शर्माकडे सोपवलं जाणं जवळपास निश्चित आहे. त्यामुळे टी20 वर्ल्डकप स्पर्धेतही रोहितकडेच नेतृत्व असेल असं क्रीडाप्रेमींचं म्हणणं आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, निवड समितीचे प्रमुख अजित आगरकरने दक्षिण अफ्रिकेत विराट कोहली आणि रोहित शर्मा यांची भेट घेतली. तेव्हा या दोन्ही खेळाडूंनी टी20 वर्ल्डकपसाठी उपलब्ध असल्याचं सांगितलं आहे.

दुसरीकडे, अफगाणिस्तान संघाच्या 19 खेळाडूंचीही मालिकेसाठी निवड करण्यात आली आहे. टी20 सामन्यात राशीद खान याचं पुनरागमन झालं आहे. पण तो एकही सामना खेळणार नसल्याचं अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने स्पष्ट केलं आहे. पाठिच्या दुखापतीनंतर त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यामुळे तो या मालिकेत खेळणार नसल्याचं सांगण्यात आलं आहे.

भारताविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी20 मालिकेसाठी अफगाणिस्तानचा संघ: इब्राहिम झद्रान (कर्णधार), रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), इक्रम अलीखिल (विकेटकीपर), हजरतुल्ला झाझाई, रहमत शाह, नजीबुल्लाह झदरन, मोहम्मद नबी, करीम जनात, अजमउल्ला ओमरझाई, शराफुद्दीन अश्रफ , मुजीब उर रहमान, फजल हक फारुकी, फरीद अहमद, नवीन उल हक, नूर अहमद, मोहम्मद सलीम, कैस अहमद, गुलबदिन नायब आणि राशीद खान.

  • भारत विरुद्ध अफगाणिस्तान, 11 जानेवारी 2024, संध्याकाळी 7 वाजता
  • भारत विरुद्ध अफगाणिस्तान, 14 जानेवारी 2024, संध्याकाळी 7 वाजता
  • भारत विरुद्ध अफगाणिस्तान, 17 जानेवारी 2024, संध्याकाळी 7 वाजता