मुंबई : टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धेपूर्वीची रंगीत तालिम सध्या सुरु आहे. अफगाणिस्तानविरुद्धच्या टी20 मालिकेकडे त्याच दृष्टीने पाहिलं जात आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी 14 महिन्यानंतर आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये पुनरागमन केलं आहे. वनडे वर्ल्डकपमधील कामगिरी पाहून बीसीसीआयने त्यांच्यावर विश्वास टाकला आहे. इतकंच काय तर रोहित शर्माकडे टीम इंडियाचं नेतृत्वही सोपवलं आहे. त्यामुळे टी20 वर्ल्डकप स्पर्धेत रोहित शर्मा कर्णधारपद भूषविताना दिसला तर आश्चर्य वाटायला नको. पण अफगाणिस्तानविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात रोहित शर्माला शून्यावर बाद होण्याची नामुष्की ओढावली. दुसऱ्या चेंडूवर धाव घेताना गिल आणि त्याच्यातील संवादाचा अभाव दिसला. त्यामुळे रोहित शर्माला खातंही खोलता आलं नाही. तसेच गिलही काही खास धावा करू शकला नाही. त्यामुळे दुसऱ्या टी20 सामन्यात त्याच्यावर टांगती तलवार आहे. दुसरीकडे, कौटुंबिक कारणामुळे विराट कोहली पहिल्या टी20 सामन्यात खेळला नव्हता. त्यामुळे दुसऱ्या टी20 सामन्यात कोणाची जागा घेणार? हा प्रश्न आहे.
दुसऱ्या टी20 सामन्यात शुबमन गिलला तंबूत बसावं लागण्याची दाट शक्यता आहे. पहिल्या सामन्यातील चूक वगैरे त्याला कारणीभूत नसेल. तर संघाच्या कॉम्बिनेशनमध्ये फिट बसणं कठीण झालं आहे. विराट कोहली संघात पुनरागमन करत आहे. तर यशस्वी जयस्वाल फीट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दुसऱ्या टी20 सामन्यात रोहित-जयस्वाल जोडी ओपनिंग करेल. प्रशिक्षक राहुल द्रविडने याबाबतचा खुलासा ही मालिका सुरु होण्यापूर्वीच केला होता. तिसऱ्या स्थानावर विराट कोहली येईल. त्यामुळे शुबमन गिलला संधी मिळणं कठीण आहे.
शुबमन गिलसोबत तिलक वर्मालाही बसावं लागण्याची शक्यात आहे. कारण मोठी खेळी करण्यात त्याला अपयश आलं होतं. त्याने फक्त 26 धावा केल्या. 22 चेंडूंचा सामना करत एक षटकार आणि दोन चौकार मारले होते. पण विराटने कमबॅक करताच ही जागा जाईल. जितेश शर्मा आणि शिवम दुबेची जागा घेणं तर खूपच कठीण आहे.
दुसऱ्या टी20 साठी संभावित प्लेइंग इलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, शिवम दुबे, जितेश शर्मा, रिंकू सिंह, अक्षर पटेल, वाशिंग्टन सुंदर, रवि बिश्नोई, अर्शदीप सिंह, मुकेश कुमार.