नवी दिल्ली | कॅप्टन रोहित शर्मा याच्या नेतृत्वात टीम इंडिया वर्ल्ड कप मोहिमेतील आपला दुसरा सामना खेळण्यासाठी उतरणार आहे. टीम इंडिया अफगाणिस्तान विरुद्ध भिडणार आहे. या सामन्याला 11 ऑक्टोबर रोजी दुपारी 2 वाजता सुरुवात होणार आहे. सामना नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियममध्ये होणार आहे. विराट कोहली आपल्या घरच्या मैदानात खेळणार आहे. त्यामुळे विराटकडून मोठ्या खेळीची अपेक्षा असणार आहे. या सामन्यात आणखी एक सामना होणार आहे, ज्याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे. विराट कोहली आणि अफगाणिस्तानच्या नवीन उल हक यांच्याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.
विराट आणि नवीन हे दोघे आयपीएल 16 व्या मोसमातील एका सामन्यात भिडले होते. तेव्हा मैदानात फुल राडा झाला होता. लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात हा सामना पार पडला होता. सामन्यादरम्यान झालेल्या वादाचे सामन्यानंतर हस्तांदोलनादरम्यान पडसाद पाहायला मिळाले होते. विराट आणि नवीन या दोघांमध्ये हमरीतुमरी पाहायला मिळाली होती.
विराट आणि नवीन या दोघांच्या वादात लखनऊ सुपर जायंट्सच्या गौतम गंभीर यानेही मध्यस्थी केली होती. त्यानंतर गंभीर आणि विराट या दोघांमध्ये झकाझकी झाली. तेव्हापासून विराट आणि नवीन या दोघांमध्ये 36 चा आकडा आहे. नवीन कायम विराटला सोशल मीडिया पोस्टद्वारे डिवचण्याचा प्रयत्न करत असतो. तसेच नवीनचा हा अखेरचा वर्ल्ड कप आहे. त्यानंतर तो निवृत्त होणार आहे. त्यामुळे नवीनचा हिशोब चुकता करण्याची विराटकडे सुवर्णसंधी आहे. त्यामुळे आता आयपीएलनंतर दोघेही आमनेसामने आल्यानंतर नक्की काय होतं, याकडे सर्वांची नजर असणार आहे.
विराटने आतापर्यंत आपल्या होम ग्राउंडमध्ये 7 सामने खेळले आहेत. विराटने या 7 पैकी 6 डावात 1 शतक आणि 1 अर्धशतकासह 222 धावा केल्या आहेत. तसेच टीम इंडियाने इथे अद्याप 21 सामने खेळले आहेत. त्यापैकी 13 सामन्यांमध्ये टीम इंडियाने विजय मिळवला आहे. तर 7 वेळा पराभवाचा सामना करावा लागलाय.
अफगाणिस्तान टीम | हशमतुल्ला शाहिदी (कॅप्टन), रहमानउल्लाह गुरबाज, इब्राहिम झद्रान, रियाझ हसन, रहमत शाह, नजीबुल्ला झद्रान, मोहम्मद नबी, इक्रम अलीखिल, अजमतुल्ला उमरझाई, रशीद खान, मुजीब उर रहमान, नूर अहमद, फजलहक फारुकी, अब्दुल रहमान आणि नवीन उल हक.
वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया | रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पांड्या (उपकर्णधार ), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, रविचंद्रन अश्विन, इशान किशन आणि सूर्यकुमार यादव.