विशाखापट्ट्णम | आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 नंतर आता टीम इंडिया नव्या कर्णधाराच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलिया विरुद्ध टी 20 मालिकेसाठी सज्ज झाली आहे. टीम इंडिया-ऑस्ट्रेलिया या वर्ल्ड कप अंतिम फेरीतील संघांमध्ये 5 टी 20 सामन्यांची ही मालिका होणार आहे. या मालिकेला आज गुरुवार 23 नोव्हेंबरपासून सुरुवात होत आहे. मालिकेतील सलामीचा सामना हा विशाखापट्टणममध्ये पार पडणार आहे. सामन्याला संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे. तर अर्धा तास आधी 6 वाजून 30 मिनिटांनी टॉस होणार आहे. या मालिकेनिमित्ताने दोन्ही संघांच्या युवा खेळाडूंचा कस लागणार आहे.
या मालिकेत सूर्यकुमार यादव याला पहिल्यांदाच टीम इंइियाच्या कर्णधारपदाची सूत्रं देण्यात आली आहेत. सूर्या टी 20 स्पेशालिस्ट बॅट्समन आहे. त्याच्या तोडफोड बॅटिंगसाठी तो प्रसिद्ध आहे. मात्र त्याला आता आपल्या बॅटिंगसह टीमची धुरा पार पाडावी लागणार आहे. त्यामुळे सूर्यकुमार यादव याचा आतापर्यंतचा अनुभव पणाला लागणार आहे. त्यामुळे सूर्याची टी 20 मालिकेत कसोटी लागणार आहे.
वर्ल्ड कप 2023 फायनलमध्ये पराभूत झाल्यानंतर टीम इंडिया पुढे पाहत आहे. आता टी 20 मालिकेनिमित्ताने टीम इंडियाने आगामी टी 20 वर्ल्ड कपच्या तयारीला सुरुवात करणार आहे. त्यामुळे टीम इंडियासाठी आणि कर्णधार म्हणून सूर्यकुमारसाठी ही मालिका अतिशय महत्त्वाची असणार आहे. तसेच पहिला सामना जिंकून कर्णधारपदाची विजयी सुरुवात करण्याचा प्रयत्न सूर्यकुमार यादव याचा असेल. त्यामुळे टीम इंडिया यात यशस्वी ठरते की कांगारु पुन्हा बाजी मारतात, याकडे भारतीय क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
टी 20 मालिकेसाठी टीम इंडिया | सूर्यकुमार यादव (कर्णधार), ऋतुराज गायकवाड (उपकर्णधार), इशान किशन, यशस्वी जयस्वाल, तिलक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, शिवम दुबे, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, प्रसिध कृष्णा, आवेश खान आणि मुकेश कुमार.
टी20 मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया | मॅथ्यू वेड (कॅप्टन), आरोन हार्डी, स्टीव्ह स्मिथ, टीम डेविड, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टोइनिस, मॅट शॉर्ट, जोश इंग्लिस, जेसन बरहेनड्रॉफ, नॅथन एलिस, सीन एब्बॉट, स्पेन्सर जॉन्सन आणि तनवीर संघा.