IND vs AUS : ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 104 धावांवर आटोपला, टीम इंडियाकडे पहिल्या डावात 46 धावांची आघाडी

| Updated on: Nov 23, 2024 | 9:53 AM

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला कसोटी सामना रंगतदार वळणावर आहे. दुसऱ्या दिवशीच पहिल्या डावाचा खेळ संपला आहे. भारताने सर्व गडी बाद 150 धावांची खेळी केली होती. या धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा डाव गडगडला. पहिल्याच दिवशी 7 बाद 67 धावा होत्या.

IND vs AUS : ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 104 धावांवर आटोपला, टीम इंडियाकडे पहिल्या डावात 46 धावांची आघाडी
Image Credit source: BCCI
Follow us on

पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावावर भारताचं वर्चस्व दिसून आलं. भारताने नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण अपेक्षेप्रमाणे फलंदाजी झाली. नितीशकुमार रेड्डी, ऋषभ पंत आणि केएल राहुल यांनी त्यातल्या त्यात चांगली फलंदाजी केली. मात्र या व्यतिरिक्त इतर फलंदाज काही खास करू शकले नाहीत. भारताने पहिल्या डावात कशाबशा 150 धावा केल्या. त्यामुळे वजन ऑस्ट्रेलियाच्या पारड्यात झुकलं होतं. पण भारतीय गोलंदाजांनी जबरदस्त गोलंदाजी करत ऑस्ट्रेलियाचं कंबरडं मोडलं. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा ऑस्ट्रेलियाच्या 67 धावांवर 7 विकेट होत्या. दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियन संघ किती धावा करतो याकडे लक्ष लागून होतं. पहिल्याच सत्रात बुमराहचा करिश्मा दिसला. 21 धावांवर खेळत असलेल्या अलेक्स कॅरेला बाद केलं. त्यामुळे भारताला आघाडी मिळणार हे स्पष्ट झालं होतं. जसप्रीत बुमराहने कर्णधारपदाला साजेशी गोलंदाजी केली. त्याने ऑस्ट्रेलियात पाच विकेटचा टप्पा गाठला. ऑस्ट्रेलियाचा डाव 104 धावांवर आटोपला. त्यामुळे भारताकडे पहिल्या डावात 46 धावांची आघाडी आहे.

मिचेल स्टार्कने तळाशी चिवट खेळी केली. त्याची विकेट काढताना भारतीय गोलंदाजांची दमछाक झाली. त्याच्या खेळीमुळे ऑस्ट्रेलियाला 100 पार धावा करता आल्या. त्याची खेळी पाहून जसप्रीत बुमराह आणि हार्षित राणा यांचा स्पेल बदलावा. तर मोहम्मद सिराज आणि नितीशकुमार रेड्डी यांनी गोलंदाजी टाकण्यास सुरुवात केली. पण त्यांनाही यश मिळवता आलं नाही. त्यानंतर वॉशिंग्टन सुंदरला ट्राय करून बघितलं. पण स्टार्कची चिवट खेळी सुरुच होती. स्टार्कने 112 चेंडूचा सामना करून 2 चौकारांच्या मदतीने 26 धावा केल्या. अखेर त्याला हार्षित राणाने बाद केलं. भारताकडून जसप्रीत बुमराहने 5, हार्षित राणाने 2 आणि मोहम्मद सिराजने 2 विकेट घेतल्या.

दोन्ही संघांची प्लेइंग 11

ऑस्ट्रेलिया (प्लेइंग इलेव्हन): उस्मान ख्वाजा, नॅथन मॅकस्वीनी, मार्नस लॅबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, ॲलेक्स कॅरी (विकेटकीपर), पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन, जोश हेझलवुड.

भारत (प्लेइंग इलेव्हन): केएल राहुल, यशस्वी जैस्वाल, देवदत्त पडिक्कल, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), ध्रुव जुरेल, नितीश रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, हर्षित राणा, जसप्रीत बुमराह (कर्णधार), मोहम्मद सिराज.