मुंबई : भारत आणि ऑस्ट्रेलियामधील चौथ्या कसोटी सामन्यामध्ये पहिल्याच दिवशी कांगारूंनी 250 चा पल्ला पार केला आहे. ऑस्ट्रेलियाचा फलंदाज उस्मान ख्वाजाने आज दिवसभर मैदानावर तळ ठोकला होता.कसोटीमध्ये गरज असते ती म्हणजे संयमाची आणि धीराची, योग्य चेंडू पाहून त्यावर धावा काढणं हा कसोटीतील खरा गेम. असाच गेम आज उस्मान ख्वाजाने आपल्या खेळीतून दाखवला. 251 चेंडूंमध्ये त्याने 104 धावा केल्या. यामध्ये त्याने 15 चौकार मारले.
उस्मान ख्वाजाने शतकी खेळी करत संघाचा डाव सावरला आणि मोठ्या धावसंख्येचा दिशेने वाटचाल केली आहे. डावखुऱ्या ख्वाजाने शतक करत 13 वर्षांचा वनवास संपला आहे. भारतामध्ये 13 वर्षांनी ऑस्ट्रेलियाच्या डावखुऱ्या फलंदाजाने शतक झळकवलं आहे. 2010-11 मध्ये मार्कस नॉर्थ याने ही कामगिरी केली होती. त्यानंतर एकाही ऑस्ट्रेलियन खेळाडूला भारतीय भूमीत शतक करता आलं नव्हतं. यासह आणखी एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे.
उस्मान ख्वाजाचं यंदाचं हे दुसरं कसोटी शतक आहे. सिडनीमध्ये त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शतक केलं होतं. दिवसभर त्याने बॅटींग करत शतक तर ठोकलंच त्यासोबतच 2013 नंतर भारतामध्ये पहिल्या दिवशी दिवसभर फलंदाजी करणार तो दुसरा बॅट्समन ठरला आहे. याआधी हा विक्रम श्रीलंकेच्या दिनेश चंदिमलच्या नावावर होता. 2027 मध्ये दिनेश चंदिमल याने सामन्याच्या तिसऱ्या दिवशी दिवसभर फलंदाजी केली होती.
दरम्यान, या कसोटी मालिकेत उस्मान ख्वाजाने सर्वाधिक धावा केल्या आहेत.आतापर्यंत 1 शतक आणि 2 अर्धशतके केली आहेत. त्यासोबतच ख्वाजा हा एकमेव खेळाडू आहे जो 3 वेळा पन्नासपेक्षा जास्त धावा केल्या आहेत.
टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत, आर अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, मोहम्मद शमी आणि उमेश यादव.
ऑस्ट्रेलियाची प्लेइंग इलेव्हन | ट्रेव्हिस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, स्टीव स्मिथ (कर्णधार), पीटर हँड्सकॉम्ब, कॅमरन ग्रीन, एलेक्स कॅरी, मिचेल स्टार्क, नाथन लायन, टॉड मर्फी आणि मॅथ्यू कुन्हेमन.