IND vs AUS 2nd Odi | टीम इंडियाचा कांगारुंवर 99 धावांनी दणदणीत विजय, 2-0 ने मालिकाही जिंकली

| Updated on: Sep 24, 2023 | 10:36 PM

india vs australia 2nd odi match result | टीम इंडियाच्या फलंदाजांनी आधी कांगारुंना फोडून काढलं. त्यानंतर टीम इंडियाच्या भेदक माऱ्यासमोर कांगारुंनी 217 धावांवर गुडघे टेकले.

IND vs AUS 2nd Odi | टीम इंडियाचा कांगारुंवर 99 धावांनी दणदणीत विजय, 2-0 ने मालिकाही जिंकली
Follow us on

इंदूर | टीम इंडियाने ऑस्ट्रेलियावर दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात डीएलएस नियमांनुसार 99 धावांनी विजय मिळवला आहे. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 400 धावांचे आव्हान दिले होते. मात्र ऑस्ट्रेलियाच्या बॅटिंगदरम्यान पावसामुळे दीडपेक्षा अधिक तासांचा खेळ वाया गेला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला 33 ओव्हर्समध्ये 317 धावांचं सुधारित आव्हान मिळालं. मात्र टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला 28.2 ओव्हरमध्ये 217 धावांवर ऑलआऊट केलं. टीम इंडियाने या विजयासह 3 सामन्यांची मालिका ही 2-0 अशा एकतर्फी फरकाने जिंकली.

ऑस्ट्रेलियाची बॅटिंग

ऑस्ट्रेलियाकडून सिन एबोट याने अखेरच्या फटकेबाजी करत सर्वाधिक 54 धावा केल्या. तर सुरुवातीला ओपनर डेव्हिड वॉर्नर याने 53 धावांची अर्धशतकी खेळी केली. मार्नस लाबुशेन याने 27 आणि जोश हेझलवूड याने 23 रन्सचं योगदान दिलं. एलेक्स कॅरी याने 14 आणि कॅमरुन ग्रीन याने 19 धावा केल्या. मॅथ्यू शॉर्ट याने 9, जोस इंग्लिस याने 6 आणि एडम झॅम्पा याने 5 धावांची खेळी केली. कॅप्टन स्टीव्हन स्मिथ याला भोपळाही फोडता आला नाही. तर सेपन्सर जॉन्सन झिरोवर नाबाद राहिला.

तर टीम इंडियाकडून शार्दुल ठाकुर दुर्देवी ठरला. शार्दुलला एकही विकेट घेण्यात अपयश आलं. मात्र त्याला 4 ओव्हरच बॉलिंग देण्यात आली. प्रसिद्ध कृष्णा याने एकाच ओव्हरमध्ये 2 विकेट्स घेत टीम इंडियाला चांगली सुरुवात करुन दिली. रवींद्र जडेजा आणि आर अश्विन या दोघांनी प्रत्येकी 3-3 विकेट्स घेतल्या. तर मोहम्मद शमी याने एकमेव विकेट्स घेत इतरांना चांगली साथ दिली.

कांगारु टीम इंडियासमोर नेस्तानाबूत


दरम्यान टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा आणि अखेरचा एकदिवसीय सामना हा बुधवारी  27 सप्टेंबर रोजी खेळवण्यात येणार आहे. या सामन्याचं आयोजन हे राजकोटमध्ये करण्यात आलं आहे.

ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन | स्टीव्हन स्मिथ (कॅप्टन), डेव्हिड वॉर्नर, मॅथ्यू शॉर्ट, मार्नस लॅबुशेन, जोस इंग्लिस, अॅलेक्स कॅरी (विकेटकीपर), कॅमेरॉन ग्रीन, सीन अॅबॉट, अॅडम झम्पा, जोश हेझलवूड आणि स्पेन्सर जॉन्सन.

टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | केएल राहुल (कॅप्टन-विकेटकीपर), शुबमन गिल, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, ईशान किशन, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी आणि प्रसिद्ध कृष्णा.