IND vs AUS : नितीश रेड्डीने बोलँडच्या चार चेंडूवरच ठोकल्या 21 धावा, पाहा Video

| Updated on: Dec 06, 2024 | 3:15 PM

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात दुसरा कसोटी सामना सुरु आहे. डे नाईट कसोटीच्या पहिल्याच दिवशी भारताचा खेळ 180 धावांवर आटोपला. पहिल्या डावात त्यातल्या त्यात नितीश रेड्डी, केएल राहुल, शुबमन गिल वगळता एकही फलंदाज साजेशी कामगिरी करू शकला नाही. नितीश रेड्डीने शेवटी चांगलीच खेळी केली.

IND vs AUS : नितीश रेड्डीने बोलँडच्या चार चेंडूवरच ठोकल्या 21 धावा, पाहा Video
Image Credit source: BCCI
Follow us on

भारताने दुसऱ्या डे नाईट कसोटी सामन्यात नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पिंक बॉल असल्याने फलंदाजांचं जास्त काही चालणार हे आधीच माहिती होतं. पण त्यातल्या त्यात सन्मानजनक स्कोअर होईल अशी अपेक्षा होती. मात्र टीम इंडियाचा डाव अवघ्या 180 धावांवर आटोपला. भारताकडून कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली आणि यशस्वी जयस्वाल फेल गेले. भारताकडून नितीश रेड्डीने सर्वाधिक धावा केल्या. त्याने 54 चेंडूत 3 षटकार आणि 3 चौकारांच्या मदतीने 42 धावा केल्या. नितीश रेड्डी भारतीय डावच्या 42 व्या षटकात स्कॉट बोलँडची धुलाई केली. बोलँडच्या या षटकात 21 धावा आल्या. यात 19 धावा त्याने बॅटने काढल्या. तर दोन धावा या नो बॉलच्या रुपाने अवांतर आला. त्याने अशी विचित्र फटकेबाजी केली की, त्याचा अंदाज ऑस्ट्रेलियाच्या बोलँडलाही नव्हता. त्याच्या या खेळीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

41 षटकापर्यंत भारताचा खेळ 8 बाद 154 धावा होत्या. नितीश रेड्डी 40 चेंडूत 23 धावांवर खेळत होता. 42 वं षटक टाकण्यासाठी बोलँड आला होता आणि स्ट्राईकला नितीश रेड्डी होता. पहिला चेंडू निर्धाव गेला. दुसऱ्या चेंडूवर उत्तुंग षटकार ठोकला. तिसऱ्या चेंडूवर चौकार मारला. चौथा चेंडू टाकताना बोलँडने चूक केली नो बॉल आणि दोन धावा आल्या. चौथा चेंडू परत टाकल्यानंतर षटकार ठोकला. पाचवा चेंडू टाकताना परत चूक करत नो बॉल टाकला आणि एक धाव घेत रेड्डीने बुमराहला स्ट्राईक दिली. बुमराहने शेवटचे दोन चेंडू निर्धाव घातले.

नितीश रेड्डीचा हा डेब्यूनंतरचा दुसराच कसोटी सामना आहे. पहिल्या कसोटी सामन्यात दोन डावात मिळून त्याने 79 धावा केल्या होत्या. नितीश आक्रमक खेळीसाठी ओळखला जातो. तसेच गरजेवेळी गोलंदाजीही करतो. ऑस्ट्रेलियाने आपल्या डावाची सुरुवात सावधपणे केली आहे. बुमराह, सिराज पहिल्या विकेटसाठी धडपड करताना दिसत आहे. पिंक बॉल स्विंग बऱ्यापैकी होत आहे. त्यामुळे लवकरात लवकर विकेट पडाव्यात याची क्रीडाप्रेमी वाट पाहात आहे.