अहमदाबाद | ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या चौथ्या कसोटीतील तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे. टीम इंडियाने तिसऱ्या दिवशी दमदार बॅटिंग करत ऑस्ट्रेलियाला चोख प्रत्युतर दिलं आहे. टीम इंडियाने तिसऱ्या दिवसापर्यंत 3 बाद 289 धावा केल्या आहेत. टीम इंडियाकडून विराट कोहली आणि रविंद्र जडेजा नाबाद परतले. टीम इंडिया अजूनही सामन्यात 191 धावांनी पिछाडीवर आहे. दरम्यान टीम इंडियाच्या फलंदाजांनी कांगारुंच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेत सामन्यात मजबूत स्थितीत पोहचलीय. सामन्याच्या चौथ्या दिवशीही क्रिकेट चाहत्यांना अशाच कामगिरीची अपेक्षा असणार आहे.
टीम इंडियाने तिसऱ्या दिवशी एकूण 256 धावा जोडल्या. शुबमन गिल आणि रोहित शर्मा या सलामी जोडीने दिवसाची सुरुवात बिनबाद 36 धावांपासून केली. या दोघांची जोडी सेट झाली होती. मात्र रोहितला मॅथ्यू कुन्हेमन याने आऊट कर ऑस्ट्रेलियाला पहिली विकेट मिळवून दिली. रोहितने 58 बॉलमध्ये 3 चौकार आणि 1 सिक्ससह 35 धावांची खेळी केली.
रोहितनंतर चेतेश्वर पुजारा मैदानात आला. पुजारा आणि गिल या दोघांनी कांगारुंना जेरीस आणलं. संयमी खेळ करत दोघांनी अधमधे फटकेबाजी करत स्कोअरबोर्ड हलता-धावता ठेवला. या दरम्यान शुबमन गिल याने खणखणीत शतक ठोकलं. गिल याचं हे भारतातील पहिलं तर कसोटी कारकीर्दीतील दुसरं शतक ठरलं. मात्र टी ब्रेकच्या काही मिनिटाआधी चेतेश्वर पुजारा आऊट एलबीडब्ल्यू आऊट झाला. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 113 धावांची शतकी भागादीर केली. पुजाराने 121 बॉलमध्ये 42 धावांची चिवट खेळी केली. पण त्याला मोठी खेळी करण्यात अपयश आलं.
त्यानंतर विराट कोहली मैदानात आला. विराटला गेल्या काही सामन्यांपासून सूर गवसत नव्हता. मात्र या सामन्यात जुना विराट क्रिकेट चाहत्यांना पाहायला मिळाला. शुबमन आणि विराट या दोघांनी जोरदार फटकेबाजी केली. या दोघांनी झटपट अर्धशतकी भागीदारी केली. शतक ठोकल्यानंतर शुबमन आणखी आक्रमक झाला होता. शुबमन ऑस्ट्रेलियासाठई डोकेदुखी ठरत होता. मात्र नॅथन लायन याने शुबमन याचा काटा काढला. शुबमन 235 बॉलमध्ये 12 चौकार आणि 1 सिक्सच्या मदतीने 128 रन्स केल्या. तिसऱ्या विकेटसाठी विराट आणि शुबमनने 58 धावा जोडल्या.
त्यानंतर रविंद्र जडेजा याला वर बॅटिंगसाठी पाठवण्यात आलं. काही ओव्हरनंतर विराटने अखेर अर्धशतक पूर्ण केलं. तर जडेजा यानेही काही फटके मारले. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा विराट 59 आणि 16 धावांवर नाबाद परतले. तोवर या जोडीने नाबाद 44 धावांची भागीदारी केली होती. आता चौथ्या दिवशी या जोडीकडून मोठ्या भागीदारीची अपेक्षा असणार आहे.
ऑस्ट्रेलिया पहिला डाव – 480 ऑलआऊट, 167.2 ओव्हर्स
टीम इंडियाची धावसंख्या (पहिला डाव)
36-0, 10 Over. (दुसऱ्या दिवसापर्यंत)
289-3, 99 Over. (तिसऱ्या दिवसापर्यंत)
टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत, आर अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, मोहम्मद शमी आणि उमेश यादव.
ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन | ट्रेव्हिस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, स्टीव स्मिथ (कर्णधार), पीटर हँड्सकॉम्ब, कॅमरन ग्रीन, एलेक्स कॅरी, मिचेल स्टार्क, नाथन लायन, टॉड मर्फी आणि मॅथ्यू कुन्हेमन.