अहमदाबाद | टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथ्या कसोटी सामन्यातील तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरु आहे. या सामन्यात टीम इंडियाचा युवा सलामीवीर फलंदाज शुबमन गिल याने शानदार शतक ठोकलं आहे. शुबमनने चौकार ठोकत आपलं शतक पूर्ण केलं. शुबमन याचं कसोटी कारकीर्दीतील हे दुसरं शतक ठरलं. शुबमन याला हे शतक पूर्ण करायला 194 बॉलचा सामना करावा लागला. यामध्ये शुबमन याने 10 चौकार आणि 1 कडक सिक्स ठोकला.
गिलचं ऑस्ट्रेलिया विरुद्धचं हे पहिलं शतक ठरलं. याआधी गिलची ऑस्ट्रेलियाविरुद्ध शतक ठोकण्याची संधी हुकली होती. गिलने 2020-21 या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील कसोटी मालिकेतील चौथ्या सामन्यात 91 धावा करुन टीम इंडियाच्या विजयात मोठं योगदान दिलं होतं. मात्र शुबमनचं शतक 9 धावांनी हुकलं होतं. पण गिलने आता पुन्हा ती चूक केली नाही. शुबमनने 97 धावांवर असताना चौकार मारत शतंक पूर्ण केलं.
दरम्यान शुबमन याने कॅप्टन रोहित शर्मा याच्यासोबत पहिल्या विकेटसाठी 74 धावांची भागीदारी केली. त्यानंतर रोहित 35 धावा करुन आऊट झाला. यानंतर आलेल्या चेतेश्वर पुजारा याच्यासोबत शुबमनने स्कोअरकार्ड हलता ठेवला. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 113 धावांची शतकी भागीदारी केली.
ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ऑलआऊट 480 रन्स केल्या. ऑस्ट्रेलियाकडून उस्मान ख्वाजा याने सर्वाधिक 180 रन्स केल्या. त्यानंतर कॅमरून ग्रीन याने 114 धावांची शतकी खेळी केली. उस्मान आणि ग्रीन या जोडीने 208 धावांची भागीदारी केली. टॉड मर्फी याने नाबाद 41 धावा केल्या. कॅप्टन स्टीव्हन स्मिथ 38 धावा करुन माघारी परतला.
नॅथन लायन याने 34 रन्सचं योगदान दिलं. ट्रेव्हिस हेड याने 32 रन्स केल्या. पीटर हँड्सकॉम्ब याने 17, मिचेल स्टार्क 6 आणि मार्नस लाबुशेन याने 3 धावा केल्या. एलेक्स कॅरी याला अश्विनने भोपळाही फोडु दिला नाही. तर कुहनेमॅन शून्यावर नाबाद परतला. टीम इंडियाडून अश्विनशिवाय मोहम्मद शमी याने 2, रविंद्र जडेजा आणि अक्षर पटेलने या जोडीने प्रत्येकी 1 विकेट घेतली.
टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत, आर अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, मोहम्मद शमी आणि उमेश यादव.
ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन | ट्रेव्हिस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, स्टीव स्मिथ (कर्णधार), पीटर हँड्सकॉम्ब, कॅमरन ग्रीन, एलेक्स कॅरी, मिचेल स्टार्क, नाथन लायन, टॉड मर्फी आणि मॅथ्यू कुन्हेमन.