भारत ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेतील चौथा सामना फिरला आहे. पहिल्यांदा ऑस्ट्रेलियाची मजबूत पकड दिसणारा सामना नितीश कुमार रेड्डीच्या खेळीने भारताच्या पारड्यात झुकला. पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने 474 धावा केल्या होत्या. त्या प्रत्युत्तरात भारताने 369 धावा केल्या. खरं तर भारतासाठी फॉलोऑन टाळणं खूपच महत्त्वाचं होतं. झालंही तसंच.. पण ऑस्ट्रेलियाकडे 105 धावांची आघाडी आहे. या आघाडीसह ऑस्ट्रेलियाची सलामीची जोडी उस्मान ख्वाजा आणि सॅम कोनस्टास मैदानात उतरली. पहिल्या डावासारखी आक्रमक खेळी पाहायला मिळेल असं वाटत होतं. पण जसप्रीत बुमराहने बरोबर डाव साधला. पहिल्या डावात हावी झालेल्या कोनस्टाला बरोबर टप्प्यात चेंडू टाकून बाद केला. संघाच्या सातव्या षटकात कोनस्टासची विकेट काढली. त्याला 18 चेंडूत फक्त 8 धावा करता आल्या.
कर्णधार रोहित शर्माने दुसऱ्या डावात संघाचं सातवं षटक टाकण्यासाठी जसप्रीत बुमराहकडे चेंडू सोपवला. समोर कोनस्टास होता. 19 वर्षीय कोनस्टासने पहिल्या डावात जसप्रीत बुमराहचा सक्षमपणे सामना केला होता. त्यामुळे या सामन्यातही द्वंद्व पाहायला मिळेल अशी अपेक्षा होती. पण मुलाखतीत सांगितल्याप्रमाणे कोनस्टासला बाद केलं. पहिल्या डावात सहा ते सात वेळा बाद करण्याची संधी होती असं बुमराह म्हणाला. पण कधी कधी कोणत्या गोष्टी घडत नाहीत. पण यावेळी बरोबर टप्प्यात कार्यक्रम केला. जसप्रीत बुमराहने 137 किमी प्रतितास वेगाने चेंडू टाकला. पॅड आणि बॅटमधलं अंतर बरोबर महागात पडलं. चेंडू पडताच स्टंप घेऊन गेला.
BUMRAH, THE GOAT.
– 26th wicket in Border Gavaskar Trophy 2024, An all-time series in Test history. 🐐 pic.twitter.com/xaS0LD6YMI
— Johns. (@CricCrazyJohns) December 29, 2024
दरम्यान, दुसऱ्या डावात टीम इंडियाने भेदक गोलंदाजीचं दर्शन घडवलं. 105 धावांची आघाडी आसताना दुसऱ्या डावात 100 धावांच्या आत निम्म्याहून अधिक संघ तंबूत गेला आहे. जसप्रीत बुमराहने कसोटीत 200 विकेटचा पल्लाही पूर्ण केला आहे. त्यामुळे हा सामना जिंकण्याची भारतीय संघाला संधी आहे असं म्हणायला हरकत नाही. दुसऱ्या डावात मार्नस लाबुशेन सोडला तर एकही फलंदाज तग धरू शकला नाही. ट्रेव्हिस हेडला चालता करण्यात जसप्रीत बुमराहला यश आलं आहे. दोन्ही डावात त्याला तंबूचा रस्ता दाखवला आहे.