भारत ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथ्या कसोटी सामन्याला सुरुवात झाली आहे. नाणेफेकीचा कौल ऑस्ट्रेलियाने जिंकला आणि प्रथम फलंदाजी घेतली. दुसरीकडे, रोहित शर्मानेही नाणेफेक जिंकली असती तर प्रथम फलंदाजी घेतली असती असं स्पष्ट केलं. दरम्यान संघात एक बदल करत वॉशिंग्टन सुंदरला प्लेइंग इलेव्हनमध्ये घेतलं आहे. शुबमन गिलला बाहेर बसवून अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदरला संधी दिली आहे. त्यामुळे फलंदाजीत बदल होणार निश्चित झालं होतं. पण कोण कोणत्या क्रमांकावर उतरणार याबाबत शंका होती. नाणेफेकीचा कौल गमावल्यानंतर समालोचक रवि शास्त्री यांनी रोहित शर्माला याबाबत सविस्तर विचारलं तेव्हा त्याने सर्व चित्र स्पष्ट केलं. रोहित शर्माने सांगितलं की, ‘आम्ही नाणेफेक जिंकलो असतो तर प्रथम फलंदाजी घेतली असती. मालिका १-१ अशी बरोबरीत आहे. त्यामुळे संघाकडे चांगली संधी आहे. कोणतीही परिस्थिती असो आम्हाला चांगला लढा द्यावा लागणार आहे. हा नवीन दिवस आहे आणि आम्हाला पुढे जावं लागेल. आम्ही संघात एक बदल केला आहे. शुबमन गिल ऐवजी संघात वॉशिंग्टन सुंदरला संधी दिली आहे. तसेच फलंदाजीचा क्रमात बदल असून मी फलंदाजीला वर येणार आहे.’
रोहित शर्माने ओपनिंगला येणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. मागच्या दोन सामन्यात रोहित शर्मा मधल्या फळीत फलंदाजीला आला होता. मात्र फार काही करू शकला नाही. एकेरी धावसंख्येवर तंबूत परतला. त्यामुळे मधल्या फळीत त्याची कामगिरी निराशाजनक असल्याचं दिसून आलं आहे. अशा स्थितीत रोहित शर्मा ओपनिंगला येणार ही चर्चा होती. अखेर रोहित शर्माने त्यावर मोहोर लावली आहे. यशस्वी जयस्वालसोबत रोहित शर्मा ओपनिंगला उतरणार हे स्पष्ट झालं आहे. तर केएल राहुल तिसऱ्या क्रमांकावर उतरू शकतो. फार फार तर रोहित शर्मा तिसऱ्या क्रमांकावर उतरू शकतो. पण आंतरराष्ट्रीय सामन्यात रोहितने टीम इंडियासाठी कायम ओपनिंग केली आहे. त्यामुळे ओपनिंगला येईल हे जवळपास स्पष्ट आहे.
ऑस्ट्रेलिया (प्लेइंग इलेव्हन): उस्मान ख्वाजा, सॅम कोन्स्टास, मार्नस लॅबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, ॲलेक्स कॅरी (विकेटकीपर), पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन, स्कॉट बोलँड.
भारत (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जयस्वाल, रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, आकाश दीप.