अहमदाबाद | टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातला चौथा कसोटी सामना हा ड्रॉ झाला आहे. यासह टीम इंडियाने 2-1 च्या फरकाने मालिका जिंकली आहे. टीम इंडियाने नागपूर आणि दिल्लीत असे सलग 2 सामने जिंकत एकतर्फी आघाडी घेतली होती. त्यानंतर टीम इंडियाचा इंदूरमधील तिसऱ्या सामन्यात पराभव झाला. या मालिकेत टीम इंडियाच्या फिरकी गोलंदाजांनी त्यातही रविंद्र जडेजा आणि आर अश्विन या जोडीने उल्लेखनीय कामगिरी केली. रविंद्र जडेजा याने 22 तर आर अश्विन याने सर्वाधिक 25 विकेट्स घेतल्या. या कामगिरीसाठी दोघांना संयुक्तरित्या ‘मॅन ऑफ द सीरिज’ म्हणून सन्मानित करण्यात आलं. अश्विनने 25 विकेट्स घेतल्याने त्याचा शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. आर अश्विन याने कारनामा केलाय, जो या आधी एकाही गोलंदाजाला जमलेला नाही.
अश्विन याने या बॉर्डर गावसकर ट्रॉफीत आतापर्यंत आपल्या फिरकीवर कांगारुंना नाचवलं. अश्विनने यासह एक रेकॉर्ड आपल्या नावावर केलाय. अश्विन याने बॉर्डर गावसकर ट्रॉफीत एका सीरिजमध्ये दुसऱ्यांदा 25 किंवा त्यापेक्षा जास्त विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहे. अश्विन अशी कामगिरी करणारा पहिला गोलंदाज ठरलाय. आतापर्यंत टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलियाकडून कोणत्याही खेळाडूला अशी कामगिरी जमलेली नाही.
बॉर्डर गावसकर ट्रॉफीचं 2013 मध्ये भारतात आयोजन करण्यात आलं होतं. या ट्रॉफीत अश्विन याने 4 सामन्यांमध्ये 29 विकेट्स घेतल्या होत्या. या ट्रॉफीतच अश्विनने 4 वेळा 5 विकेट्स घेतल्या होत्या. तसेच एकदा 10 किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स पटकावल्या होत्या. सध्याच्या या मालिकेत अश्विनने 25 विकेट्स घेतल्या आहेत. अश्विनने चौथ्या कसोटीतील पहिल्या डावात 6 विकेट्स घेतल्या होत्या.
या सामन्याच्या निकालाआधीच टीम इंडियाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्ये धडक मारली. न्यूझीलंडने श्रीलंकेवर 2 विकेट्सने थरारक विजय मिळवला. या विजयासह न्यूझीलंडने 1-0 अशी आघाडी घेतली. न्यूझीलंडच्या या विजयामुळे टीम इंडियाचा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलचं तिकीट कन्फर्म झालं. त्यामुळे आता वर्ल्ड चॅम्पियनशीप फायनलचा सामना हा 7 जून रोजी द ओव्हल मैदानात टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळवण्यात येणार आहे.
दरम्यान टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियाविरुद्धचा विजय हा भारतातील सलग 16 वा मालिका विजय ठरला आहे. यावरुन एक गोष्ट लक्षात येते की टीम इंडियाला भारतात येऊन हरवणं हे अवघड नाहीच, तर अशक्य आहे.
दरम्यान या कसोटी मालिकेनंतर टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात 17 मार्चपासून एकदिवसीय मालिका खेळवण्यात येणार आहे. ही एकूण 3 सामन्यांची मालिका असणार आहे. सीरिजमधील सलामीचा सामना हा मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये पार पडणार आहे.