अहमदाबाद | वेस्टइंडिजचा दिग्गज खेळाडू आणि माजी कर्णधार ब्रायन लारा याच्या नावावर अनेक विक्रम आहेत. लारा हा क्रिकेट विश्वातील यशस्वी कर्णधारांपैकी एक आहे. त्याने अनेक प्रतिष्ठीत मालिकांमध्ये विंडिजला विजय मिळवून दिलाय. लाराने कसोटी क्रिकेटमध्ये सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्येचा विक्रम केला आहे. यासारखे अनेक विक्रम लाराच्या नावावर आहे. लाराचा असाच एक मोठा विक्रम टीम इंडियाचा स्टार बॅट्समन विराट कोहली याने ब्रेक केला आहे. त्यामुळे सोशल मीडियावर विराटचं कौतुक होत आहे. तसंच विराट ट्विटरवर ट्रेंडही होत आहे.
विराटने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या चौथ्या कसोटीतील पहिल्या डावात तिसऱ्या दिवसा नाबाद 59 धावांची खेळी केली. विराटने या खेळीदरम्यान अनेक रेकॉर्ड ब्रेक केले. त्यापैकी सर्वात मोठा रेकॉर्ड म्हणजे ब्रायन लारा याचा. विराट ब्रायन लारा याला मागे टाकत ऑस्ट्रेलिया विरुद्ध सर्वाधिक आंतरराष्ट्रीय धावा करणारा दुसरा फलंदाज ठरला. तर ऑस्ट्रेलिया विरुद्ध सर्वाधिक आंतरराष्ट्रीय धावांचा विक्रम हा सचिन तेंडुलकर याच्या नावावर आहे.
लाराच्या नावावर ऑस्ट्रेलिया विरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 4 हजार 714 धावांची नोंद आहे. तर विराटने त्याला मागे टाकत दुसरा क्रमांक पटकावलाय. तर सचिन 6 हजार 707 धावांसह अव्वल क्रमांकावर आहे.
सचिन तेंडुलकर – 6 हजार 707 रन्स
विराट कोहली – 4 हजार 715* धावा
ब्रायन लारा – 4 हजार 714 धावा
विराटने तब्बल 13 महिन्यांच्या अंतराने कसोटी क्रिकेटमध्ये अर्धशतक ठोकलं आहे. विराटने अखेरचं अर्धशतक हे केपटाउनमध्ये जानेवारी 2022 मध्ये केलं होतं. तेव्हा विराटने 79 धावांची खेळी केली होती. तर आता 59 धावांवर नाबाद आहे. तसेच विराटचा ऑस्ट्रेलिया विरुद्धचा चौथा कसोटी सामना हा त्याचा भारतातील 50 वा सामना ठरलाय.
दरम्यान टीम इंडियाने तिसऱ्या दिवसापर्यंत 3 बाद 289 धावा केल्या आहेत. टीम इंडियाकडून विराट कोहली आणि रविंद्र जडेजा नाबाद परतले. टीम इंडिया अजूनही सामन्यात 191 धावांनी पिछाडीवर आहे. दरम्यान टीम इंडियाच्या फलंदाजांनी कांगारुंच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेत सामन्यात मजबूत स्थितीत पोहचलीय.
टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत, आर अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, मोहम्मद शमी आणि उमेश यादव.
ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन | ट्रेव्हिस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, स्टीव स्मिथ (कर्णधार), पीटर हँड्सकॉम्ब, कॅमरन ग्रीन, एलेक्स कॅरी, मिचेल स्टार्क, नाथन लायन, टॉड मर्फी आणि मॅथ्यू कुन्हेमन.