बंगळुरु | टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाचव्या आणि शेवटच्या टी 20 सामन्यासाठी 24 तासांपेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे. उभयसंघातील पाचवा टी 20 सामना हा 3 डिसेंबर रोजी संध्याकाळी 7 वाजता सुरु होणार आहे. टीम इंडियाने ही मालिका आधीच जिंकली आहे. टीम इंडिया 5 सामन्यांच्या मालिकेत 3-1 ने आघाडीवर आहे. टीम इंडियाने मालिकेतील पहिले 2 सामने जिंकून 2-0 अशी आघाडी घेतली. तर ऑस्ट्रेलियाने तिसरा सामना जिंकून मालिकेतील आव्हान कायम राखलं. मात्र टीम इंडियाने चौथा सामना जिंकून मालिका खिशात घातली. आता पाचवा सामना जिंकून कांगारुंना चितपट करण्याचा प्रयत्न टीम इंडियाचा असणार आहे.
टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील 3 डिसेंबरला होणारा 31 वा टी 20 सामना असणार आहे. याआधीच्या 30 सामन्यांमध्ये टीम इंडिया कांगारुंवर वरचढ राहिली आहे. टीम इंडियाने 18 वेळा विजय मिळवलाय. तर ऑस्ट्रेलियाने 11 सामन्यात विजय मिळवला आहे. तर एक सामन्याचा निकाल लागू शकला नाही. टीम इंडिया 7 सामन्यात पहिले बॅटिंग करुन जिंकली आहे. तर ऑस्ट्रेलियाला 4 वेळा विजय मिळवण्यात यश आलंय. तसेच टीम इंडियाने चेजिंग करताना 10 आणि ऑस्ट्रेलियाने 6 सामने जिंकलेत.
टीम इंडियाने भारतात ऑस्ट्रेलिया विरुद्ध 14 पैकी 9 सामने जिंकलेत. तर 5 सामन्यात पराभवाचं तोंड पहावं लागलंय. तसेच त्रयस्थ ठिकाणी उभयसंघांची आकडेवारी ही 50-50 अशी राहिली आहे. टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलियाने प्रत्येकी 2-2 सामने जिंकले आहेत.
टी 20 सीरिजसाठी टीम इंडिया | सूर्यकुमार यादव (कर्णधार), श्रेयस अय्यर (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, इशान किशन, यशस्वी जयस्वाल, तिलक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, शिवम दुबे, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, प्रसिध कृष्णा, आवेश खान आणि मुकेश कुमार.
ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीम | मॅथ्यू वेड (कॅप्टन आणि विकेटकीपर), जोश फिलिप, ट्रॅव्हिस हेड, बेन मॅकडरमॉट, अॅरॉन हार्डी, टिम डेव्हिड, मॅथ्यू शॉर्ट, बेन द्वारशुइस, ख्रिस ग्रीन, जेसन बेहरेनडॉर्फ, तन्वीर संघा, नॅथन एलिस आणि केन रिचर्डसन.