इंदूर | टीम इंडियाने आतापर्यंत बॉर्डर गावसकर ट्रॉफीत शानदार कामगिरी केली आहे. टीम इंडिया या 4 सामन्यांच्या मालिकेत 2-0 ने आघाडीवर आहे. टीम इंडियाने कांगारुंचा नागपूर आणि दिल्ली कसोटीत धुव्वा उडवला. त्यानंतर आता तिसरा कसोटी सामना हा इंदूरमधील होळकर स्टेडियममध्ये 1 मार्चपासून होणार आहे. त्याआधी टीम इंडियाचा हेड कोच याने 2 खेळाडूंची ‘टेस्ट’ घेतली आहे. इंदूर कसोटीत खेळण्यासाठी या दोन्ही खेळाडूंमध्ये कडवी झुंज पाहायला मिळणार आहे.
केएल राहुल आणि शुबमन गिल या दोघांनी तिसऱ्या टेस्टआधी नेट्समध्ये जोरदार सराव केला. दोघांनी सोबत बॅटिंग केली. केएल ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या दोन्ही सामन्यात सपशेल अपयशी ठरला. त्यानंतर उर्वरित 2 सामन्यांसाठी त्याला संघात स्थान देण्यात आलं, मात्र त्याच्याकडे असलेलं उपकर्णधारपद काढून घेण्यात आलं.
तर दुसऱ्या बाजूला केएलच्या जागी इनफॉर्म बॅट्समन शुबमन गिल याला संधी देण्यात यावी, असं म्हटलं जात आहे. या दोघांनी कोच द्रविडच्या मार्गदर्शनाखाली 30 मिनिटं सराव केला. त्यामुळे टीम मॅनेजमेंट तिसऱ्या कसोटीतही पुन्हा केएल राहुल याच्यावर विश्वास दाखवत त्याला संधी देते, की युवा शुबमन गिल याचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करते, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
दरम्यान तिसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स खेळणार नाही. कौटुंबिक कारणामुळे पॅट मायदेशी परतला आहे. त्यामुळे पॅटच्या जागी स्टीव्ह स्मिथ कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळणार आहे.
स्टीव्हने एकूण 36 कसोटी सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाची कॅप्टन्सी केलीय. यातील 20 सामन्यात पॅटने ऑस्ट्रेलियाला विजयी केलं आहे. स्टीव्हकडे कॅप्टन्सीचा अनुभव आहे. त्यामुळे आता स्टीव्ह ऑस्ट्रेलियाला या मालिकेत पहिला विजय मिळवून देणार का, याकडे ऑस्ट्रेलियाच्या चाहत्यांचं लक्ष असणार आहे. तिसरा कसोटी सामना हा इंदूरमधील होळकर स्टेडियममध्ये 1-5 मार्चदरम्यान खेळवण्यात येणार आहे.
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, केएस भरत (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), आर अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रविंद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, उमेश यादव आणि जयदेव उनाडकट.
टीम ऑस्ट्रेलिया | स्टीव स्मिथ (कॅप्टन), एश्टन एगर, स्कॉट बोलैंड, एलेक्स कॅरी, कैमरून ग्रीन, पीटर हैंड्सकॉम्ब, जोश हेजलवुड, ट्रेविस हेड, उस्मान ख्वाजा, मैथ्यू कुह्नमॅन, मार्नस लाबुशेन, नाथन लियोन, लांस मॉरिस, टॉड मर्फी, मैथ्यू रेनशॉ ,मिशेल स्टार्क आणि मिशेल स्वीपसन.