भारतीय क्रिकेट संघाला मायदेशात पाहुण्या न्यूझीलंड टीमकडून कसोटी मालिकेत 3-0 ने पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर आता टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यात रोहित शर्मा याच्या नेतृत्वात प्रतिष्ठेची बॉर्डर गावस्कर ट्रॉफी ही मालिका खेळणार आहे. यंदा या मालिकेत पहिल्यांदाच 5 सामने खेळवण्यात येणार आहेत. भारताने न्यूझीलंड विरुद्ध एकूण तिन्ही सामने गमावले. त्यामुळे टीम इंडियाची वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप स्पर्धेतील पॉइंट्स टेबलमध्ये दुसऱ्या स्थानी घसरण झाली. तसेच आता भारताला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्ये पोहचायचं असेल तर ऑस्ट्रेलियाविरुद्ध 4-1 अशा फरकाने मालिका जिंकावी लागणार आहे. या मालिकेला 22 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. त्याआधी टीम इंडियाच्या दिग्गजाने या मालिकेबाबत आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप वर्ल्ड कप फायनलबाबत प्रतिक्रिया दिली आहे.
टीम इंडिया ऑस्ट्रेलियाला 4-0 ने पराभूत करु शकत नाही, असं लिटिल मास्टर सुनील गावसकर यांना वाटतं. तसेच भारतीय खेळाडूंनी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलऐवजी या ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या कसोटी मालिकेकडे अधिक लक्ष केंद्रीत करायला हवं, असं गावसकर यांना वाटतं. गावसकर नक्की काय म्हणाले? हे आपण जाणून घेऊयात.
“टीम इंडिया ऑस्ट्रेलियाला 4-0 ने पराभूत करु शकत नाही. मात्र त्यांनी तसं केलं तर मला फार आनंद होईल. पण 4-0… वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलबाबत विचार करु नका. आता फक्त ऑस्ट्रेलिया विरुद्धची मालिका जिंकण्याकडे लक्ष द्या. मालिका 1-0, 2-0, 3-0 किंवा 2-1 ने, फक्त विजय मिळवा. कारण तेव्हाच आम्ही एक भारतीय क्रिकेट चाहते म्हणून आनंद व्यक्त करु शकू”, असं गावसकर स्पोर्ट्स तकच्या एका कार्यक्रमात म्हणाले.
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कॅप्टन), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, अभिमन्यू ईश्वरन, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (विकेटकीपर), सरफराज खान, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रवीचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, आकाश दीप, प्रसिध कृष्णा, हर्षित राणा, नितीश कुमार रेड्डी आणि वॉशिंग्टन सुंदर.
राखीव खेळाडू : मुकेश कुमार, नवदीप सैनी, खलील अहमद.