IND vs AUS Final | ट्रेव्हिस हेडच्या शतकामुळे टीम इंडियाचं स्वप्न भंग, ऑस्ट्रेलिया वर्ल्ड चॅम्पियन

| Updated on: Nov 19, 2023 | 9:40 PM

IND vs AUS Final World Cup 2023 Result | टीम इंडियाकडे ऑस्ट्रेलियाला पराभूत करत 20 वर्षांआधीच्या पराभवाची वचपा घेण्याची संधी होती. मात्र ट्रेव्हिस हेड याच्या तडाखेदार खेळीने पुन्हा एकदा 20 वर्षांनी कांगारुंनी टीम इंडियाचं वर्ल्ड कप जिंकण्याचं स्वप्न भंग केलं.

IND vs AUS Final | ट्रेव्हिस हेडच्या शतकामुळे टीम इंडियाचं स्वप्न भंग, ऑस्ट्रेलिया वर्ल्ड चॅम्पियन
Follow us on

अहमदाबाद | आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 ट्रॉफी जिंकण्याचं टीम इंडियाचं स्वप्न भंग झालं आहे. ऑस्ट्रेलिया टीम इंडियावर 20 वर्षांनी पुन्हा एकदा अंतिम सामन्यात विजय मिळवत वर्ल्ड चॅम्पियन ठरली आहे.ऑस्ट्रेलियाने सहाव्यांदा वर्ल्ड कप जिंकण्याची कामगिरी केली आहे. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 241 धावांचं आव्हान दिलं होतं. ऑस्ट्रेलियाने हे आव्हान 43 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून पूर्ण केलं. ट्रेव्हिस हेड हा ऑस्ट्रेलियाच्या विजयाचा खरा हिरो ठरला. तर अंतिम सामन्यात पराभव झाल्याने भारतीय क्रिकेट चाहत्यांमध्ये नाराजीचं वातावरण आहे.

ऑस्ट्रेलियाची बॅटिंग

डेव्हिड वॉर्नर आणि ट्रेव्हिस हेड ही ऑस्ट्रेलियाची सलामी जोडी 241 धावांच्या पाठलागासाठी मैदानात आली. या दोघांनी सावध सुरुवात करण्याचा प्रयत्न केला. मात्र या प्रयत्नांना भारतीय गोलंदाजांनी सुरुंग लावला. टीम इंडियाच्या गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाला 7 ओव्हरमध्ये 3 झटके दिले. डेव्हिड वॉर्नर 7, मिचेल मार्श 15 आणि स्टीव्हन स्मिथ 4 धावा करुन आऊट झाले. मात्र त्यानंतर हेड आणि मार्नस लबुशेन या दोघांनी ऑस्ट्रेलियाच्या विजयाचा पाया रचला. या दोघांनी विक्रमी भागीदारी केली. या दरम्यान ट्रेव्हिस हेड याने शतक आणि लबुशेन याने अर्धशतक ठोकलं. हेड आणि लबुशेन या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 192 धावांची भागीदारी केली. त्यानंतर हेड 137 धावा करुन आऊट झाला. मात्र तोवर ऑस्ट्रेलियाच्या विजयाची औपचारिकता बाकी राहिली होती.

हेडनंतर ग्लेन मॅक्सेवल आला आणि विजयी धावा काढल्या. मॅक्सवेलने नाबाद 2 धावा केल्या. तर लबुशेनने 58 धावांची नाबाद अर्धशतकी खेळी केली. टीम इंडियाकडून जसप्रीत बुमराह याने 2 विकेट्स घेतल्या. तर मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज या दोघांनी 1-1 विकेट घेतली.

टीम इंडियाची बॅटिंग

त्याआधी ऑस्ट्रेलिया कॅप्टन पॅट कमिन्स याने टॉस जिंकून टीम इंडियाला बॅटिंगसाठी भाग पाडलं. टीम इंडियाने 50 ओव्हमध्ये ऑलआऊट 240 धावा केल्या. टीम इंडियाकडून केएल राहुल आणि विराट कोहली या दोघांनी सर्वाधिक धावा केल्या. रोहितने 47 धावांचं योगदान दिलं. तर इतर फलंदाजांनी ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांसमोर गुडघे टेकले.

केएल राहुल याने 107 बॉलमध्ये 66 धावा केल्या. विराटने 54 धावांचं योगदान दिलं. कॅप्टन रोहितने 31 बॉलमध्ये 47 धावा केल्या. रोहित मोठा फटक्याच्या प्रयत्नात आऊट झाला. रोहितची विकेट ही टीम इंडियासाठी फार मोठा झटका ठरला. सूर्यकुमार यादव याने 18 आणि कुलदीप यादव याने 10 धावांचं योगदान दिलं. शुबमन गिल आणि श्रेयस अय्यर दोघेही प्रत्येकी 4-4 धावा करुन मैदानाबाहेर गेले. रविंद्र जडेजा आणि मोहम्मद सिराज या दोघांनी 9-9* धावा केल्या. मोहम्मद शमी याने 6 आणि जसप्रीत बुमराहने 1 धाव केली.

ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्क याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. जोश हेझलवूड आणि कॅप्टन पॅट कमिन्स या दोघांनी 2 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर ग्लेन मॅक्सवेल आणि एडम झॅम्पा या दोघांनी 1-1 विकेट घेत इतरांना चांगली साथ दिली.

टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव आणि मोहम्मद सिराज.

ऑस्ट्रेलिया प्लेईंग ईलेव्हन | पॅट कमिन्स (कॅप्टन), ट्रॅव्हिस हेड, डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, स्टीव्हन स्मिथ, मार्नस लॅबुशेन, ग्लेन मॅक्सवेल, जोश इंग्लिस (विकेटकीपर), मिचेल स्टार्क, एडम झाम्पा आणि जोश हेझलवूड.