मुंबई : वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेच्या अंतिम फेरीत टीम इंडियाने जबरदस्त कामगिरी केली आहे. अंतिम फेरीपर्यंत टीम इंडियाने एकही सामना गमावलेला नाही. उपांत्य फेरीत न्यूझीलंडचा 70 धावांनी पराभव केला. त्यानंतर आता अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाशी लढत होणार आहे. त्यामुळे या सामन्यात कोण बाजी मारणार? याची उत्सुकता ताणली गेली आहे. ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत पाचवेळा जेतेपदावर नाव कोरलं आहे. तर भारताने दोनदा जेतेपद नावावर केलं आहे. त्यामुळे दोन्ही संघ विजयासाठी जोर लावतील यात शंका नाही. भारताकडून कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल, शुबमन गिल, मोहम्मद शमी हे सर्व खेळाडू जबरदस्त फॉर्मात आहेत. पण माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर याने अंतिम फेरीत एका खेळाडूवर जबरदस्त विश्वास दाखवला आहे. हा खेळाडू सामना फिरवण्याची ताकद ठेवले असं गौतम गंभीर याने सांगितलं आहे. हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून श्रेयस अय्यर आहे.
श्रेयस अय्यरने आतापर्यंत खेळलेल्या 10 सामन्यात 2 शतकं आणि 3 अर्धशतकांच्या जोरावर 526 धावा केल्या आहेत. सचिन तेंडुलकर, विराट कोहली आणि रोहित शर्मानंतर 500 हून अधिक धावा करणारा खेळाडू ठरला आहे. गौतम गंभीरने स्टार स्पोर्टशी बोलताना सांगितलं की, “मला असं वाटतं की अंतिम सामन्यात श्रेयस अय्यर गेम चेंजर ठरेल. दुखापतीवर मात करून श्रेयसने जबरदस्त कमबॅक केलं आहे. बाद फेरीतही त्याने 70 चेंडूत शतक ठोकलं. ते खरंच उल्लेखनीय आहे. अंतिम फेरीत श्रेयस अय्यर महत्त्वाची भूमिका बजावेल. ग्लेन मॅक्सवेल आणि एडम झाम्पा गोलंदाजी करतील तेव्हा त्यांचा सामना करण्यास श्रेयस सक्षम असेल.”
आघाडीचे फलंदाज अपयशी ठरले तर संपूर्ण जबाबदारी मधल्या फळीच्या फलंदाजांवर येणार आहे. तेव्हा ही जबाबदारी श्रेयस अय्यर सक्षमपणे पेलेल हे मागच्या सामन्यांमधून दिसून आलं आहे. मागच्या चार सामन्यात श्रेयसने 82, 77, नाबाद 128 आणि 105 धावांची खेळी केली आहे. तसेच वर्ल्डकपमध्ये बॅक टू बॅक शतक ठोकण्याची कामगिरीही केली आहे. उपांत्य फेरीत सौरव गांगुली आणि कोहलीनंतर शतक ठोकणारा तिसरा फलंदाज ठरला आहे.