मुंबई : आयसीसी वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन संघ भिडणार आहेत. वर्ल्डकप इतिहासात दुसऱ्यांदा अंतिम फेरीत हे दोन संघ समोरासमोर आले आहेत. 2003 आणि 2023 या 20 वर्षांच्या कालावधीत बरेच योगायोग जुळून आले आहेत. आता घडलेल्या घडामोडी तेव्हा बरोबर उलट घडल्या होत्या. तेव्हा ऑस्ट्रेलियाने 10 सामने सलग जिंकत, भारताने 8 सामने जिंकत अंतिम फेरी गाठली होती. तेव्हा साखळी फेरीत ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव केला होता. आता भारताने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला आहे. असं बरंचसं गणित जुळून आलं आहे. वर्ल्डकप जेतेपदासाठी भारताला सर्वाधिक पसंती दिली जात आहे. भारताने विजय मिळवल्यास तिसरं जेतेपद असणार आहे. भारताने उपांत्य फेरीत न्यूझीलंडला 70 धावांनी पराभूत करत 2019 वर्ल्डकपचा वचपा काढला आहे. आता 2003 चा वचपा काढण्याची भारताकडे संधी आहे. या सामन्यात दोन्ही संघांच्या निवडक 11 खेळाडूंवर नजर असणार आहे.
विराट कोहली या स्पर्धेत जबरदस्त फॉर्मात आहे. सर्वाधिक 711 धावा करत टॉपवर आहे. यात तीन शतकं आणि पाच अर्धशतकांचा समावेश आहे. त्यामुळे कर्णधार किंवा उपकर्णधारासाठी विराट कोहलीला पसंती दिली जाऊ शकते. त्यात ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेविड वॉर्नरही चांगली कामगिरी करत आहे. 10 सामन्यात 528 धावा केल्या आहेत. यात दोन शतकं आणि दोन अर्धशतकांचा समावेश आहे. तर हा पर्यायही कर्णधार किंवा उपकर्णधारासाठी योग्य ठरू शकतो. शेवटी त्या दिवशी कोणता खेळाडू चांगली कामगिरी करेल सांगता येत नाही.
ऑस्ट्रेलिया : डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, स्टीव्हन स्मिथ, मार्नस लाबुशेन, कॅमेरून ग्रीन, एलेक्स कॅरी (विकेटकीपर), ग्लेन मॅक्सवेल, पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, जोश हेझलवूड, एडम झाम्पा.
भारत : रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज.