चेन्नई | आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 मधील पाचव्या सामन्याला अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. या पाचव्या सामन्यात टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया आमनेसामने असणार आहेत. ऑस्ट्रेलिया आणि टीम इंडिया या दोन्ही संघांचा यंदाच्या वर्ल्ड कपमधील पहिलाच सामना आहे. टीम इंडियाच्या पहिल्या सामन्याची क्रिकेट चाहत्यांना प्रतिक्षा आहे. टीम इंडियाने वर्ल्ड कपआधी ऑस्ट्रेलियावर एकदिवसीय मालिकेत 2-1 असा विजय मिळवला. या मालिकेत टीम इंडियाच्या सर्व खेळाडूंनी दमदार कामगिरी केली. त्यामुळे वर्ल्ड कपमधील टीम इंडियाच्या पहिल्या सामन्याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे.
टीम इंडिया-ऑस्ट्रेलिया यांच्यात रविवारी 8 ऑक्टोबर रोजी सामना चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियम खेळवण्यात येणार आहे. या सामन्याला दुपारी 2 वाजता सुरुवात होणार आहे. तर दुपारी दीड वाजता टॉस होणार आहे. ऑस्ट्रेलिया आणि टीम इंडिया या दोन्ही संघात एकमेकांविरुद्ध वनडे फॉर्मेटमध्ये कोण सरस आहे, हे आपण जाणून घेऊयात.
टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात आतापर्यंत एकूण 149 वनडे सामने खेळवण्यात आले आहेत. ऑस्ट्रेलियाचा या 149 पैकी सर्वाधिक सामन्यात टीम इंडियावर दबदबा राहिला आहे. ऑस्ट्रेलियाने टीम इंडियावर 149 पैकी 83 सामन्यात विजय मिळवला आहे. तर टीम इंडियाला 56 सामन्यात विजय मिळवण्यात यश आलंय. तर 10 सामन्यांचा निकाल लागू शकला नाही. तर 1 सामना बरोबरीत सुटलाय.
दरम्यान टीम इंडिया -ऑस्ट्रेलिया दोन्ही संघ आयसीसी वनडे वर्ल्ड कप इतिहासात एकूण 12 वेळा भिडले आहेत. इथेही ऑस्ट्रेलियाचा वरचष्मा राहिला आहे. ऑस्ट्रेलियाने 12 पैकी 8 सामन्यात टीम इंडियाला लोळवलंय. तर टीम इंडियान कांगारुंना 4 मॅचमध्ये चितपट केलंय.
ऑस्ट्रेलिया टीम | पॅट कमिन्स (कर्णधार ), स्टीव्ह स्मिथ, अॅलेक्स कॅरी, जोश इंग्लिस, सीन अॅबॉट, कॅमेरॉन ग्रीन, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, मार्नस लॅबुशेन, मिच मार्श, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, डेव्हिड वॉर्नर, अॅडम झाम्पा, मिचेल स्टार्क.
टीम इंडिया | रोहित शर्मा (कॅप्टन), हार्दिक पांड्या (उपकर्णधार ), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, रविचंद्रन अश्विन, इशान किशन आणि सूर्यकुमार यादव.