आयसीसी वूमन्स वर्ल्ड कप 2024 स्पर्धेत टीम इंडियाचा अवघ्या 9 धावांनी पराभव झाला आहे. ऑस्ट्रेलियाने भारताला विजयासाठी 152 धावांचं आव्हान दिलं होतं. टीम इंडियाने विजयी धावांचा पाठलाग करताना शेवटपर्यंत झुंज दिली. मात्र टीम इंडियाचे प्रयत्न अपुरे पडले. टीम इंडियाला 20 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 142 धावाच करता आल्या. टीम इंडियाकडून कॅप्टन हरमनप्रीत कौर हीने अर्धशतकी खेळी केली. मात्र तिला दुसऱ्या बाजूने अपेक्षित साथ मिळाली नाही. ऑस्ट्रेलिया या विजयासह ए ग्रुपमधून सेमी फायनलमध्ये पोहचणारी पहिली टीम ठरली आहे. तर भारताच्या पराभवामुळे सेमी फायनलचं समीकरण हे आता पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड सामन्यावर अवलंबून आहे. या सामन्याचा निकाल पाकिस्तानच्या बाजूने लागल्यास उपांत्य फेरीत पोहचणारा दुसरा संघ हा नेट रनरेटच्या निकषावर ठरेल.
टीम इंडियाकडून कॅप्टन हरमनप्रीत कौर हीने सर्वाधिक धावा केल्या. हरमनने नाबाद 54 धावा केल्या, मात्र तिला दुसर्या बाजूने साथ न मिळाल्याने टीम इंडियाला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरली. हरमनव्यतिरिक्त दीप्ती शर्मा हीने 29 तर शफाली वर्मा हीने 20 धावा केल्या. तर जेमिमाह रॉड्रिग्स हीने 16 धावा केल्या. मात्र इतरांना काही खास करता आलं नाही. ऑस्ट्रेलियाकडून ॲनाबेल सदरलँड आणि सोफी मोलिनक्स या दोघींनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या. तर मेगन शुट आणि ऍशले गार्डनर या दोघींनी 1-1 विकेट घेतली.
आता टीम इंडिया उपांत्य फेरीत जाणार की नाही? याचा निर्णय पराभवानंतर नेट रनरेटच्या निकषावरुन ठरणार आहे. ऑस्ट्रेलियाने साखळी फेरीतल विजयी चौकार ठोकून उपांत्य फेरीत धडक दिली आहे. तर टीम इंडिया +0.322 या नेट रनरेटसह दुसऱ्या स्थानी आहे. न्यूझीलंडनेही 2 सामने जिंकलेत. त्यांचा नेट रनरेट हा +0.282 असा आहे. आता ए ग्रुपमधील साखळी फेरीतील सामन्यात पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड आमनेसामने असणार आहेत. पाकिस्तानने आतापर्यंत फक्त 1 मॅचच जिंकली आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या खात्यात 2 पॉइंट्स आहेत. अशात न्यूझीलंडने पाकिस्तानवर मात केली तर ते थेट उपांत्य फेरीत पोहचतील. तर टीम इंडिया आणि पाकिस्तानचा अधिकृतरित्या बाजार उठल्याचं समजावं.
तर दुसऱ्या बाजूला पाकिस्तान न्यूझीलंडला लोळवलं, तर टीम इंडियासह या तिन्ही संघांचे प्रत्येकी आणि समसमान 4 गुण होतील. अशात या तिघांपैकी ज्यांचा नेट रनरेट सरस असेल तो संघ पुढचा प्रवास करेल. नेट रनरेटच्या बाबतीत टीम इंडिया न्यूझीलंडपेक्षा सरस आहे. त्यामुळे आता पाकिस्तान-न्यूझीलंड सामन्याच्या निकालाकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे.
ऑस्ट्रेलिया वूमन्स प्लेइंग ईलेव्हन : ताहिला मॅकग्रा (कॅप्टन), बेथ मूनी (विकेटकीपर), ग्रेस हॅरिस, एलिस पेरी, ऍशले गार्डनर, फोबी लिचफील्ड, जॉर्जिया वेरेहॅम, ॲनाबेल सदरलँड, सोफी मोलिनक्स, मेगन शुट आणि डार्सी ब्राउन.
टीम इंडिया वूमन्स प्लेइंग ईलेव्हन : हरमनप्रीत कौर (कॅप्टन), शफाली वर्मा, स्मृती मानधना, जेमिमाह रॉड्रिग्स, रिचा घोष (विकेटकीपर), दीप्ती शर्मा, पूजा वस्त्राकर, अरुंधती रेड्डी, श्रेयांका पाटील, आशा शोभना आणि रेणुका ठाकूर सिंग.