भारतीय पुरुष संघ पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियात पोहोचला आहे. असं असताना भारतीय क्रीडारसिकांना आता वनडे मालिकेची मेजवानी मिळणार आहे. यासाठी बीसीसीआयच्या निवड समितीने 16 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. या संघाचं नेतृत्व हरमनप्रीत कौर करणार आहे. तर उपकर्णधारपदाची धुरा स्मृती मंधानाच्या खांद्यावर असणार आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षभरापासून संघाबाहेर असलेल्या हरलीन देओलची मालिकेसाठी निवड झाली आहे. हरलीन देओल टीम इंडियासाठी शेवटचा सामना डिसेंबर 2023 मध्ये खेळली होती. त्यानंतर तिला संघात स्थान मिळालं नाही. दक्षिण अफ्रिका आणि न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतून तिला वगळण्यात आलं होतं. असं असताना निवड समितीने दोन आश्चर्यकारक धक्के दिले आहे. लेडी सेहवाग म्हणून प्रसिद्ध असलेली शफाली वर्मा आणि फिरकीपटू प्रियंका पाटील यांना डावललं आहे. शफाली वर्मा गेल्या काही सामन्यात फ्लॉप गेली होती. त्या पार्श्वभूमीवर डावललं गेल्याची चर्चा क्रीडावर्तुळात रंगली आहे.
20 वर्षीय शफाली वर्मा या वर्षात खेळलेल्या सहा सामन्यात फक्त 108 धावा करू शकली आहे. तिचा सर्वोत्तम स्कोअर हा 33 आहे. तिला मागच्या वर्षीत ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेतून आऊट केलं होतं. पण याच वर्षी जून महिन्यात बंगळुरुत दक्षिण अफ्रिकेविरुद्ध कमबॅक केलं होतं. शफालीने 2022 मध्ये श्रीलंकेविरुद्ध नाबाद 71 धावा केल्या होत्या. तेव्हापासून आतापर्यंत एकही अर्धशतक ठोकलं नाही. दुसरीकडे, मागच्या महिन्यात न्यूझीलंडला 2-1 ने पराभूत करण्याऱ्या संघात श्रेयंका पाटील, उमा छेत्री, डी हेमलता आणि सायली सतघारे होत्या. पण त्यांनाही डावलण्यात आलं आहे.
भारत एकदिवसीय महिला संघ: हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मंधाना (उपकर्णधार), प्रिया पुनिया, जेमिमा रॉड्रिग्ज, हरलीन देओल, यास्तिका भाटिया (यष्टीरक्षक), ऋचा घोष (यष्टीरक्षक), तेजल हसबनीस, दीप्ती शर्मा, मिन्नू मणी, प्रिया मणी , राधा यादव , तीतस साधू , अरुंधती रेड्डी , रेणुका सिंग ठाकूर , सीमा ठाकूर.