Brisbane Test : 5 विकेट घेत कांगारुंना आस्मान दाखवणारा सिराज वडिलांच्या आठवणीने व्याकूळ, म्हणाला…

| Updated on: Jan 18, 2021 | 8:53 PM

मोहम्मद सिराजने दुसऱ्या डावात गोलंदाजी करताना शानदार कामगिरी केली. त्याने कांगारुंच्या एकूण 5 फलंदाजांना माघारी धाडलं.

Brisbane Test : 5 विकेट घेत कांगारुंना आस्मान दाखवणारा सिराज वडिलांच्या आठवणीने व्याकूळ, म्हणाला...
Follow us on

ब्रिस्बेन : ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील (Aus vs Ind 4th Test) चौथा कसोटी सामना रंगतदार स्थितीत पोहचला आहे. टीम इंडियाने चौथ्या दिवसापर्यंत बिनबाद 4 धावा केल्या आहेत. यामुळे सामन्याच्या 5 व्या दिवशी विजयासाठी 324 धावांची आवश्यकता आहे. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या डावात 296 धावांवर रोखलं. यामुळे भारताला विजयासाठी 328 धावांचे आव्हान दिले आहे. मोहम्मद सिराजने दुसऱ्या डावात गोलंदाजी करताना शानदार कामगिरी केली. त्याने कांगारुंच्या एकूण 5 फलंदाजांना माघारी धाडलं. या कामगिरीसह त्याने मानाच्या पंगतीत स्थान मिळवलं आहे. (Ind vs Aus: Mohammad Siraj Misses His Father After Birsbane 5-for, Thanks Mother For Support)

मोहम्मद सिराजने ऑस्ट्रेलियाच्या 5 फलंदाजांना आऊट केलं. यामध्ये त्याने मार्नस लाबुशेन, मॅथ्यू वेड, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क आणि जोश हेझलवुड यांना बाद केलं. यासह सिराज हा ब्रिस्बेनवर टीम इंडियाकडून कसोटीत एका डावात 5 विकेट्स घेणारा 5 वा गोलंदाज ठरला. सध्या सुरु असलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत सिराजने डेब्यू केला आहे आणि याच मालिकेत त्यांने कारकीर्दीत पहिल्यांदाच एका डावात 5 विकेट घेण्याचा रेकॉर्ड केला आहे. दरम्यान ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात भारतीय गोलंदाज शार्दुल ठाकूरनेदेखील शानदार कामगिरी केली आहे. शार्दुलने या डावात चार विकेट घेत सिराजला चांगली साथ दिली.

सिराज ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेल्यानंतर काही दिवसांनी (20 नोव्हेंबर) सिराजचे वडील मोहम्मद गौस (53) यांचं निधन झालं. फुप्फुसांशी संबंधित आजाराने ते त्रस्त होते, त्यावर उपचारही सुरु होते, परंतु त्यातच त्यांचे निधन झालं. कोरोनाबाबतच्या निर्बंधांमुळे सिराज त्याच्या वडिलांच्या अंत्यसंस्काराच्या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकला नव्हता. सिराजचे वडील रिक्षाचालक होते. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत मोहम्मद गौस यांनी त्यांच्या मुलाला वाढवलं आणि त्याचं क्रिकेटर बनण्याचं स्वप्नदेखील पूर्ण केलं. परंतु आपल्या मुलाला आंतरराष्ट्रीय कसोटी संघात पदार्पण करताना पाहण्याचे त्याच्या वडिलांचे स्वप्न अपूर्ण राहिले.

सिराजने त्याची कसोटी कारकीर्द दणक्यात सुरु केली आहे. परंतु त्याचे वडिल हा क्षण पाहू शकले नाहीत. दरम्यान, ब्रिस्बेन कसोटीत आजच्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना मोहम्मद सिराज वडिलांच्या आठवणीने व्याकूळ झाला. तो म्हणाला की, वडिलांच्या आशीर्वादामुळेच मी ही कामगिरी करु शकलो आहे. सिराज म्हणाला की, “माझ्या वडिलांची इच्छा होती की त्यांचा मुलगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळावा आणि सर्व जगाने त्याला पाहावं. आज ते या जगात असते तर माझी आजची कामगिरी पाहून त्यांना खूप आनंद झाला असता. त्यांच्या आशीर्वादामुळेच मी आज पाच विकेट घेऊ शकलो. या गोष्टीचे वर्णन करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. ”

सिराजने यावेळी सांगितले की, वडिलांच्या निधनानंतर त्याची आई सतत त्याला प्रेरणा देते, यामुळे तो चांगली कामगिरी करू शकला, सिराज म्हणाला की, “मी खूप नशीबवान आहे कारण मी आजच्या सामन्यात पाच विकेट घेऊ शकलो. परंतु माझ्यासाठी सध्याची परिस्थिती खूप कठीण आहे. माझं सुख पाहायला माझे वडिल या जगात नाहीत. मी माझ्या घरच्यांशी बोलतो, आईशी बोलतो, ती मला सतत प्रेरित करत असते. ती मला शक्ती देत असते. तिच्या पाठिंब्यामुळेच मला मानसिक शक्ती मिळाली. मला माझ्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिची प्रेरणा कामी आली.

पाहा काय म्हणला सिराज?

 

टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या डावात ऑल आऊट केलं. यानंतर टीम इंडिया डगआऊटच्या दिशेने निघाली. यावेळेस टीम इंडियाच्या राखीव खेळाडूंनी तसेच इतर सहकाऱ्यांनी सिराजचं बाऊंड्री लाईनवर टाळ्या वाजवत अभिनंदन केलं. तसेच यॉर्कर किंग जस्प्रीत बुमराहाने सिराजला मिठी मारत अभिनंदन केलं.

हेही वाचा

Aus vs Ind 4th Test | मोहम्मद सिराजची ‘फाईव्ह’ स्टार कामिगरी, मानाच्या पंगतीत स्थान

 टीम इंडियाला चौथा कसोटी सामना जिंकण्यासाठी गावसकरांचा गुरुमंत्र

(Ind vs Aus: Mohammad Siraj Misses His Father After Birsbane 5-for, Thanks Mother For Support)