मुंबई | टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथा कसोटी सामना हा अनिर्णित राहिला. यासह टीम इंडियाने 4 सामन्यांची मालिका ही 2-1 च्या फरकाने जिंकली. टीम इंडियाचा बॉर्डर गावसकर ट्रॉफीतील ऑस्ट्रेलिया विरुद्धचा सलग चौथा तर भारतातील 16 वा मालिका विजय ठरला. टेस्ट सीरिजनंतर टीम इंडिया आणि क्रिकेट चाहत्यांना वेध लागलेत ते एकदिवसीय मालिकेचे. या 3 सामन्यांच्या वनडे सीरिजला 17 मार्चपासून सुरुवात आहे. या मालिकेआधी टीमसाठी वाईट बातमी समोर आली आहे. टीम इंडियाचा कॅप्टन वैयक्तिक कारणामुळे पहिल्या सामन्यात खेळणार नाही.तर दुसऱ्या बाजूला पॅट कमिन्स हा कसोटी मालिकेनंतर आता वनडे सीरिजमधूनही बाहेर पडला आहे. त्यामुळे कसोटी मालिका गमावलेली ऑस्ट्रेलिया अडचणीत सापडली आहे.
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स वनडे मालिकेलाही मुकणार आहे. पॅट आईची प्रकृती गंभीर असल्याने तो दुसऱ्या कसोटीनंतर मायदेशी परतला होता. त्यानंतर पॅट तिसऱ्या आणि चौथ्या कसोटीत त्याला खेळता आलं नव्हतं. त्यामुळे पॅटच्या अनुपस्थितीत स्टीव्ह स्मिथने ऑस्ट्रेलियाच्या कर्णधारपदाची धुरा सांभाळली होती. चौथ्या सामन्यादरम्यान पॅटच्या आईने जगाचा निरोप घेतला होता. त्यानंतर आता पॅट वनडे सीरिजसाठी परतणार नसल्याची माहिती ऑस्ट्रेलियाचे कोच एंड्रयू मॅकडोनाल्ड यांनी दिली.
“पॅट परत येणार नाही, तो अजूनही घरच्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. आम्ही पॅट आणि त्याच्या कुटुंबासोबत आहेत. पॅट सध्या दुखात आहे”, असंही एंड्रयू मॅकडोनाल्ड म्हणाले.
पॅटच्या अनुपस्थितीत ऑस्ट्रेलियाचा अनुभवी आणि माजी कर्णधार असलेला स्टीव्ह स्मिथ हा वनडे सीरिजमध्ये सूत्र सांभाळणार आहे. स्टीव्हने कसोटी मालिकेतील शेवटच्या 2 सामन्यात नेतृत्व केलं होतं. ऑस्ट्रेलियाने स्टीव्हच्या कॅप्टन्सीत इंदूरमध्ये विजय मिळवत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्ये धडक मारली होती. आता पुन्हा स्टीव्ह स्मिथ वनडेत संघांचं कर्णधारपद सांभाळणार आहे.
स्टीव्ह स्मिथ सांभाळणार ऑस्ट्रेलियाची कॅप्टन्सी
Pat Cummins won’t return to India for the ODI leg of the tour #INDvAUS
— cricket.com.au (@cricketcomau) March 14, 2023
पहिली वनडे, 17 मार्च, मुंबई
दुसरी वनडे, 19 मार्च, विशाखापट्टणम
तिसरी वनडे, 22 मार्च, चेन्नई
या तिन्ही सामन्यांना दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे.
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, केएल राहुल, इशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), रविंद्र जडेजा, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमरान मलिक, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल आणि जयदेव उनाडकट.