टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात रोहित शर्माने कर्णधारपदाला साजेशी कामगिरी केली.रोहित शर्माने या वर्ल्डकपमधील सर्वात वेगवान अर्धशतक झळकावलं. 19 चेंडूत अर्धशतकी खेळी केली. पण रोहित शर्माचं शतक अवघ्या 8 धावांनी हुकलं. रोहित शर्माने 41 चेंडूत 92 धावा केल्या. यात त्याने 8 षटकार आणि 7 चौकार मारले. खरं तर गेल्या काही दिवसांपासून रोहित शर्मा डावखुऱ्या गोलंदाजांना बाद होतो अशी चर्चा आहे. आकडेवारी पाहता यात तथ्यही आहे. वर्ल्डकपमध्येच याची प्रचिती वारंवार आली आहे. त्यामुळेच ऑस्ट्रेलियाने महत्त्वाच्या सामन्यात हुकमी पान काढलं. डावखुऱ्या मिचेल स्टार्कला संघात स्थान दिलं. त्यामुळे रोहित शर्माचं काही खरं नाही असंच वाटत होतं. पण रोहित शर्माने या सर्वांना तिलांजली देत निडर फलंदाजी केली. मिचेल स्टार्कवर आक्रमक प्रहार केला.
मिचेल स्टार्कने पहिलं षटक टाकलं आणि रोहित शर्मा चाचपडताना दिसला. पहिल्या दोन चेंडूवर त्याची अनुभूती आली. तिसऱ्या चेंडूवर स्टार्कने चौकार मारला. त्यानंतर एक धाव घेतली. मिचेल स्टार्कला अशा पाच धावा घेतल्या. संघाचं तिसरं आणि वैयक्तिक दुसरं षटक पुन्हा एकदा मिचेल स्टार्क टाकण्यासाठी आला. यावेळी रोहित शर्माच्या तळपायाची आग मस्तकात गेली होती. पहिल्याच चेंडूवर षटकार मारून रोहितने आपला हेतू स्पष्ट केला. दुसऱ्या चेंडूवर षटकार, तिसऱ्या चेंडूवर चौकार, चौथ्या चेंडूवर षटकार, पाचवा चेंडू निर्धाव आणि सहाव्या चेंडूवर पुन्हा षटकार ठोकला.
संघाचं 12वं आणि वैयक्तिक तिसरं षटक टाकण्यासाठी मिचेल स्टार्क आला. पहिल्या चेंडूवर धाव आली नाही. दुसऱ्या चेंडूवर क्लिन बोल्ड झाला. रोहित शर्माने 92 धावांची खेळी केली पण डावखुऱ्या गोलंदाजाला विकेट देऊन बसला. त्यामुळे त्याच्या या विकेटची चर्चा तर होणारच.. दरम्यान भारताने 20 षटकात 5 गडी गमवून 205 धावा केल्या आणि विजयासाठी 206 धावांचं आव्हान दिलं आहे.
भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह.
ऑस्ट्रेलिया (प्लेइंग इलेव्हन): ट्रॅव्हिस हेड, डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श (कर्णधार), ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, टिम डेव्हिड, मॅथ्यू वेड (विकेटकीपर), पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, ॲडम झाम्पा, जोश हेझलवूड.