मुंबई : वनडे वर्ल्डकपच्या पराभवाची जखम अजूनही ताजी आहे. पराभवाच्या जखमा विसरून टीम इंडिया पुढच्या प्रवासासाठी सज्ज झाली आहे. आयसीसी चषकांचा दुष्काळ संपवण्याची संधी पुन्हा एकदा 2024 मध्ये चालून आली आहे. त्यामुळे नव्या दमाच्या खेळाडूंसोबत पुन्हा एकदा मोर्चेबांधणी केली जात आहे. यासाठी टीम इंडियाला ऑस्ट्रेलियासोबत पाच सामन्यांची टी20 मालिका खेळणार आहे. भारतीय संघ ऑस्ट्रेलिया विरुद्द पहिला टी20 सामना 23 नोव्हेंबरला विशाखापट्टणम येथे खेळणार आहे. दुसरा सामना तिरुअनंतपुरम येथे होणार आहे. तिसरा सामना 28 नोव्हेंबरला गुवाहटीला, चौथा सामना 1 डिसेंबरला रायपूर आणि पाचवा साना 3 डिसेंबरला बंगळुरुत होणार आहे. भारतीय वेळेनुसार हा सामना संध्याकाळी 7 वाजता सुरु होणार आहे.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाच सामन्यांच्या टी20 मालिकेसाठी वरिष्ठ खेळाडूंना आराम दिला जाणार आहे. तर हार्दिक पांड्या दुखापतग्रस्त असल्याने या मालिकेत खेळणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे या मालिकेसाठीची धुरा ऋतुराज गायकवाड याच्याकडे असेल असं बोललं जात आहे. ऋतुराज गायकवाड यांच्या नेतृत्वात टीम इंडियाने एशियन गेम्समध्ये गोल्ड मेडल पटकावलं होतं. त्याचबरोबर भविष्यातील टीम बांधणीसाठी त्याच्याकडे धुरा दिली जाणार आहे. 2024 साली टी20 वर्ल्डकप स्पर्धा आहे.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध मालिका असली तर टी20 वर्ल्डकप डोळ्यासमोर असणार आहे. त्या दृष्टीने खेळाडूंची निवड केली जाणार आहे. सूर्यकुमार यादव, इशान किशन, रिंकू सिंह, प्रसिद्ध कृष्णा, तिलक वर्मा, वॉशिंग्टन सुंदर, शुबमन गिल, यशस्वी जयसवाल, केएल राहुल, रवींद्र जडेजा, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंह या खेळाडूंना संधी मिळण्याची दाट शक्यता आहे.
ऑस्ट्रेलिया टीम : डेविड वॉर्नर, स्टीव्ह स्मिथ, टीम डेविड, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टोइनिस, मॅट शॉर्ट, जोश इंग्लिस, मॅथ्यू वडे, जेसन बरहेनड्रॉफ, नथन इलिस, सीन अब्बॉट, स्पेन्सर जॉन्सन, तनवीर संघा.