नागपूर : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात 4 सामन्यांची टेस्ट सीरिज खेळवण्यात येणार आहे. या मालिकेला 9 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. उभयसंघात पहिला सामना हा विदर्भातील नागपुरात पार पडणार आहे. टीम इंडियाचा स्टार फलंदाज केएल राहुल हा मोठ्या विश्रांतीनंतर कमबॅक करतोय. केएल विकेटकीपर बॅट्समन आहे. त्यामुळे केएल या मालिकेत नक्की कोणत्या भूमिकेत दिसेल याबाबत बीसीसीआय अधिकाऱ्यानी माहिती दिली आहे.
ओपनिंग जोडी म्हणून गेल्या अनेक सामन्यांमध्ये रोहित शर्मा आणि केएल राहुल ही जोडी लोकप्रिय ठरली. तर दुसऱ्या बाजूला युवा शुबमन गिल जबरदस्त कामगिरी करतोय. शुबमनने या कामगिरीसह सलामीसाठी आपली दावेदारी सिद्ध केलीय. तसेच केएलऐवजी रोहितसोबत शुबमन ओपनिंग करु शकतो, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
तर केएल राहुलला विकेटकीपर म्हणून खेळवण्यात येऊ शकतं, असं दिग्गजांचा अंदाज आहे. मात्र बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलंय. या मालिकेत केएलला विकेटकीपर म्हणून संधी मिळणार नाही, असं अधिकाऱ्याने म्हटलं. त्यामुळे आता केएलला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळण्याची शक्यता कमीच आहे.
केएलला गेल्या वर्षभरात अनेक दुखापती झाल्या. कसोटीत केएलने कीपिंग करणं कदाचित योग्य ठरणार नाही. कसोटी क्रिकेटमध्ये स्पेशालिस्ट विकेटकीपरची आवश्यकता असते. टीममध्ये आधीच केएस भरत आणि इशान किशन असे 2 विकेटकीपर आहेत. आता या दोघांमधून मॅनेजमेंट कुणाची निवड करणार, हा त्यांच निर्णय असेल”, असं बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने इनसाईड स्पोर्ट्सला सांगितलं.
ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या 2 कसोटी सामन्यांसाठी टीम इंडिया
रोहित शर्मा (कॅप्टन), केएल राहुल (उपकर्णधार), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, सूर्यकुमार यादव, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), आर अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव आणि जयदेव उनाडकट.
टीम इंडिया विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया
पॅट कमिन्स (कर्णधार), डेविड वॉर्नर, एश्टोन एगर, स्कॉट बोलँड, एलेक्स कॅरी, कॅमरन ग्रीन, जोश हेझलवुड, पीटर हॅंडस्कॉम्ब, ट्रेविस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, नॅथन लियॉन, लांस मॉरिस, टॉड मरफी, मॅथ्यू रेनशॉ, स्टीव स्मिथ, मिशेल स्टार्क आणि मिशेल स्वीपसन.