अहमदाबाद | टीम इंडिया ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या चौथ्या कसोटीआधी नेट्समध्ये जोरदार सराव करत आहे. टीम इंडिया या मालिकेत 2-1 ने आघाडीवर आहे. मात्र असं असलं तरी अहमदाबादमध्ये होणारा हा सामना टीम इंडियासाठी ‘करो या मरो’ असा आहे. त्याआधी क्रिकेट विश्वातून एक वाईट बातमी समोर आली आहे.
इंग्रजी वृत्तपत्राचे वरिष्ठ क्रीडा पत्रकार एस दिनाकर यांचा इंदूरमधील एका हॉटेलमध्ये मृत्यू झाला आहे. डॉक्टरांनी प्रथमदर्शनी दिनाकर यांना हृदयविकाराचा झटका आल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. मध्यप्रदेश क्रिकेट बोर्डाच्या अधिकाऱ्याने मंगळवारी ही माहिती दिली. अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार “दिनाकर विजय नगर येथील एका हॉटेलमध्ये बेशुद्ध अवस्थेत होते. त्यानंतर दिनाकर यांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आलं”.
या प्रकरणात संपूर्ण माहिती घेतल्यानंतरच काही प्रतिक्रिया देता येईल, असं पोलीस उपायुक्त संपत उपाध्याय म्हणाले. “दिनाकर यांनी इंदूरमध्ये झालेला तिसऱ्या कसोटी सामन्याचं वार्तांकन केलं. त्यानंतर ते अहमदाबाद कसोटीसाठी तयारी करत होते”, अशी माहिती त्यांच्या सहकाऱ्याने दिली.
दरम्यान दिनाकर यांच्याआधी क्रीडा पत्रकारितेचे जनक व्ही व्ही करमरकर यांचंही निधन झालं. करमरकर यांच्या निधनाने क्रीडा विश्वावर शोककळा पसरली. वृत्तपत्रात क्रीडा बातम्यांसाठी सर्वात आधी स्वतंत्र पानाची सुरुवात ही करमरकर यांनी केली होती. त्यांच्या निधनाने क्रीडा विश्वाचं अतोनात नुकसान झालं. त्यांच्यावर सोमवारी अंधेरी पूर्व येथील पारशीवाडा स्माशनभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
टीम ऑस्ट्रेलिया | स्टीव्ह स्मिथ (कॅप्टन), स्कॉट बोलँड, अॅलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, पीटर हँड्सकॉम्ब, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, उस्मान ख्वाजा, मॅट कुहनेमन, मार्नस लॅबुशेन, नॅथन लियॉन, लान्स मॉरिस, टॉड मर्फी, मॅथ्यू रेनशॉ, मिचेल स्टार्क आणि मिचेल स्वीपसन.
टीम इंडिया | रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत, इशान किशन, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव , सूर्यकुमार यादव आणि जयदेव उनाडकट.