टीम इंडिया विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना हा द गाबा, ब्रिस्बेन येथे खेळवण्यात येत आहे. या सामन्यातील पहिल्या दिवसाचा बहुतांश खेळ पावसामुळे वाया गेला. टीम इंडियासाठी ही मालिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलच्या हिशोबाने फार महत्त्वाची आहे. त्यामुळे टीम इंडिया या सामन्यात पूर्ण ताकदीने मैदानात उतरली होती. मात्र पहिल्याच दिवशी पावसाने खोडा घातला. टीम इंडियाने याच गाबात गेल्या दौऱ्यात ऐतिहासिक विजय मिळवत कांगारुंचा माज उतरवला होता आणि 4 सामन्यांची मालिका 2-1 ने जिंकली होती. मात्र यंदा टीम इंडियाची ‘कसोटी’ असणार आहे. कारण गेल्या दौऱ्यात ज्या 6 खेळाडूंनी भारताला गाबात ऐतिहासिक विजय मिळवून देण्यात निर्णायक भूमिका बजावली होती, त्यांची यंदा निवडही करण्यात आली नाही. त्या 6 खेळाडूंबाबत जाणून घेऊयात.
टीम इंडियाने 19 जानेवारी 2021 रोजी ऑस्ट्रेलियावर गाबात ऐतिहासिक विजय मिळवला होता. ऋषभ पंतने विजयी चौकार ठोकत कांगारुंचा माज उतरवला होता. पंत आणि इतर 6 खेळाडूंचाही या विजयात सिंहाचा वाटा होता. मात्र ते 6 खेळाडू आता या दौऱ्यासाठी भारतीय संघाचा भाग नाहीत.
टी नटराजन याने या सामन्यातील पहिल्या डावात 3 विकेट्स घेतल्या होत्या. नटराजनने शतकवीर मार्नस लबुशेन, मॅथ्यू वेड आणि जोश हेझलवूड यात तिघांना बाद केलं होतं.
ऑलराउंडर शार्दूल ठाकुर याने या सामन्यातील पहिल्या डावात 3 तर दुसऱ्या डावात 4 असे एकूण 7 विकेट्स घेतल्या. तर पहिल्या डावात अर्धशतक खेळी केली होती. शार्दुलने 67 धावा केल्या होत्या.
अजिंक्य रहाणे याने त्या सामन्यातटीम इंडियाचं नेतृत्व केलं होतं. रहाणेने त्या सामन्यात अनुक्रमे 37 आणि 24 धावा केल्या होत्या. तसेच चेतेश्वर पुजारा याने दुसऱ्या डावात 211 बॉलमध्ये 56 रन्सची चिवट खेळी केली होती. मयंक अग्रवाल आणि नवदीप सैनी यांचाही त्या सामन्यात समावेश होता. मात्र आता या दोघांचीही निवड करण्यात आली नाही. त्यामुळे रोहितसेना या 6 खेळाडूंशिवाय गाबात पुन्हा कसा इतिहास रचणार? याकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे.