टीम इंडिया विरुद्ध बांगलादेश यांच्यातील 3 सामन्यांच्या टी 20I मालिकेला रविवार 6 ऑक्टोबरपासून सुरुवात होत आहे. मालिकेतील सलामीचा सामना हा ग्वाल्हेर येथे होत आहे. नजमुल हुसैन शांतो बांगलादेशचं नेतृत्व करणार आहे. तर सूर्यकुमार यादव याच्याकडे भारतीय संघाची धुरा आहे. सूर्याची नियमित कर्णधार म्हणून ही बांगलादेश विरुद्धची पहिलीच मालिका असणार आहे. सूर्याने पहिल्या सामन्याच्या पूर्वसंध्येला एक मोठी घोषणा केली आहे.टीम इंडियाकडून अभिषेक शर्मा याच्यासह ओपनिंगला येणारा दुसरा फलंदाज कोण असणार? याबाबत कॅप्टन सूर्याने स्पष्ट केलं आहे. त्यामुळे ओपनिंग कोण करणार? या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे.
यशस्वी जयस्वाल आणि शुबमन गिल या युवा फलंदाजांना आगामी न्यूझीलंड विरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे या अभिषेक शर्माला ओपनर म्हणून कोण साथ देणार याची उत्सुकता होती. कॅप्टन सूर्याने अभिषेकसोबत विकेटकीपर फलंदाज संजू सॅमसन ओपनिंग करणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. सूर्याने सामन्याच्या पूर्वसंध्येला आयोजित पत्रकार परिषदेत याबाबतची माहिती दिली. तसेच सूर्याने खेळपट्टीबाबतही प्रतिक्रिया दिली.
“टी 20 क्रिकेटमध्ये खेळपट्टी चांगली असते. हे एक आव्हान आहे. खेळपट्टी आणि परिस्थितीतबाबत आम्हाला माहित आहे. दवबाबतही आम्ही विचार करत आहोत. आम्हाला काय करायचंय? हे माहित आहे. जर कुणी योगदान दिलं तर त्याचा परिणाम मिळेलच. मी माझी कॅप्टन्सी इन्जॉय करतोय”, असं सूर्याने म्हटलं. सूर्याच्या नेतृत्वात भारताने श्रीलंकेविरुद्ध 3-0 ने टी 20I मालिका जिंकली होती. आता टीम इंडियाची युवा ब्रिगेड बांगलादेश विरुद्ध कशी कामगिरी करते? याकडे लक्ष असणार आहे.
बांगलादेश विरूद्धच्या टी 20I मालिकेसाठी टीम इंडिया : सूर्यकुमार यादव (कॅप्टन), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), रिंकू सिंग, हार्दिक पंड्या, रियान पराग, नितीश कुमार रेड्डी, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, वरुण चक्रवर्ती, जितेश शर्मा (विकेटकीपर), अर्शदीप सिंग, हर्षित राणा आणि मयंक यादव.
टी 20i मालिकेसाठी बांगलादेश टीम : नजमुल हुसेन शांतो (कॅप्टन), लिटन दास, मेहदी हसन मिराज, तस्कीन अहमद, तंजीद हसन, परवेज होसैन इमोन, तॉहीद हृदॉय, झाकेर अली, महेदी हसन, रिशाद होसैन, मुस्तफिजुर रहमान, शोरीफुल इस्लाम, तंजीम हसन साकिब, रकीबुल हसन आणि महमुदुल्लाह.