हार्दिक पंड्याची नाबाद विस्फोटक खेळी आणि संजू सॅमसन- कॅप्टन सूर्यकुमार या जोडीच्या प्रत्येकी 29 धावांच्या मदतीने भारतीय क्रिकेट संघाने बांगलादेश विरूद्धच्या टी 20I मालिकेत विजयी सुरुवात केली आहे. ग्वाल्हेरमधील न्यू माधवराव शिंदे क्रिकेट स्टेडियममध्ये बांगलादेशने पहिल्या टी 2OI सामन्यात भारताला विजयासाठी 128 धावांचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान भारताने सहज पूर्ण करत धमाकेदार विजय संपादित केला. टीम इंडियाने 11.5 ओव्हरमध्ये 3 विकेट्स गमावून 132 धावा केल्या. टीम इंडियाने या विजयासह 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशा फरकाने आघाडी घेतली आहे.
हार्दिक पंड्या आणि नितीश रेड्डी या जोडीने टीम इंडियाला विजय मिळवून दिला. हार्दिकने 16 बॉलमध्ये 5 फोर आणि 2 सिक्ससह नॉट आऊट 39 रन्स केल्या. डेब्यूटंट नितीश रेड्डी याने 15 बॉलमध्ये नॉट आऊट 16 रन्स केल्या. त्याआधी संजू सॅमसन याने 29 धावांचं योगदान दिलं. सूर्यकुमार यादवने 14 बॉलमध्ये 29 रन्स केल्या. तर अभिषेक शर्माने 16 धावा काढल्या. तर बांगलादेशकडून मुस्तफिजुर रहमान आणि मेहदी हसन मिराज या दोघांनी प्रत्येक 1-1 विकेट घेतली.
त्याआधी टीम इंडियाने टॉस जिंकून बांगलादेशला बॅटिंगसाठी भाग पाडलं. मात्र भारतीय गोलंदाजांसमोर बांगलादेशने गुडघे टेकले. भारतीय गोलंदाजांनी बांगलादेशला 1 चेंडू शेष असताना 127 धावांवर ऑलआऊट केलं. बांगलादेशकडून मेहदी हसन मिराज याने सर्वाधिक नाबाद 35 धावांचं योगदान दिलं. तर कॅप्टन नजमुल शांतोने 27 धावा केल्या. या व्यतिरिक्त भारतीय गोलंदाजांसमोर एकालाही 20 पार मजल मारता आली नाही. टीम इंडियाकडून अर्शदीप सिंह आणि वरुण चक्रवर्ती या दोघांनी प्रत्येकी 3-3 विकेट्स घेतल्या. तर हार्दिक पंड्या, मयंक यादव आणि वॉशिंग्टन सुंदर या त्रिकुटाने प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.
टीम इंडियाची विजयी सुरुवात
Hardik Pandya finishes off in style in Gwalior 💥#TeamIndia win the #INDvBAN T20I series opener and take a 1⃣-0⃣ lead in the series 👌👌
Scorecard – https://t.co/Q8cyP5jXLe@IDFCFIRSTBank pic.twitter.com/uYAuibix7Q
— BCCI (@BCCI) October 6, 2024
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : सूर्यकुमार यादव (कॅप्टन), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), नितीश रेड्डी, हार्दिक पंड्या, रियान पराग, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग आणि मयंक यादव.
बांगलादेश प्लेइंग ईलेव्हन : नजमुल हुसेन शांतो (कॅप्टन), लिटन दास (विकेटकीपर), परवेझ हुसैन इमॉन, तॉहीद हृदोय, महमुदुल्ला, झाकेर अली, मेहदी हसन मिराझ, रिशाद हुसेन, तस्किन अहमद, मुस्तफिजुर रहमान आणि शोरीफुल इस्लाम.