भारतीय क्रिकेट संघाने दुसऱ्या टी 20I सामन्यात बांगलादेशवर 86 धावांनी मात करत मालिका जिंकली. टीम इंडियाने 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी एकतर्फी आघाडी घेतली. टीम इंडियाने नितीश रेड्डी 74 आणि रिंकू सिंह याच्या 53 धावांच्या जोरावर 221 धावांपर्यंत मजल मारली. त्यामुळे बांगलादेशला विजयासाठी 222 धावांचं आव्हान मिळालं. या धावांचा पाठलाग करताना बांगलादेशच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांसमोर गुडघे टेकले. बांगलादेशला 20 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 135 धावांपर्यंतच मजल मारता आली.बांगलादेशकडून एकट्या अनुभवी महमुदुल्लाह याचा अपवाद वगळता एकालाही 20 पेक्षा अधिक धावा करता आल्या नाहीत. महमुदुल्लाहने सर्वाधिक 41 धावा केल्या. तर टीम इंडियाकडून नितीश रेड्डी याने बॅटिंगनंतर बॉलिंगनेही योगदान दिलं. नितीश आणि वरुण चक्रवर्थी या दोघांनी प्रत्येकी 2-2 विकट्स घेतल्या. तर इतर 5 जणांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.
टीम इंडियाचा हा या 2024 वर्षातील 20 वा विजय ठरला. तसेच टीम इंडियाने मायदेशात सलग सातवी टी20I मालिका जिंकली. टीम इंडियाच्या या विजयानंतर कर्णधार सूर्यकुमार यादवने आनंद व्यक्त केला. तसेच सूर्याने नितीश रेड्डी आणि रिंकू सिंहचं तोंडभरुन कौतुक केलं. नितीशने युवा खेळाडूंबाबतही प्रतिक्रिया दिली. सूर्याने काय म्हटलं हे जाणून घेऊयात.
“मी त्या दोघांसाठी (रिंकू आणि नितीश) आनंदी आहे. त्यांनी मला अपेक्षित तशीच बॅटिंग केली. वेगवेगळे गोलंदाज वेगवेगळ्या परिस्थितीत काय करू शकतात हे मला पाहायचे होते. कधी हार्दिक पंड्या बॉलिंग करत नाही. तर कधी वॉशिंग्टन सुंदर गोलंदाजी करत नाही. मला इतर खेळाडूंकडे काय गुण आहेत ते पाहायचं होतं. आजचा दिवस हा त्याचा (नितीशचा) होता. त्याचा आनंद द्विगुणित करावा असं मला वाटलं”, असं सूर्याने सामन्यानंतर म्हटलं.
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : सूर्यकुमार यादव (कॅप्टन), संजू सॅमसन (विकेटकीपर), अभिषेक शर्मा, नितीश रेड्डी, हार्दिक पांड्या, रियान पराग, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग आणि मयंक यादव.
बांगलादेश प्लेइंग ईलेव्हन: नजमुल हुसेन शांतो (कॅप्टन), परवेझ हुसेन इमॉन, लिटन दास (विकेटकीपर), तॉहीद हृदोय, महमुदुल्लाह, जाकेर अली, मेहदी हसन मिराझ, रिशाद हुसेन, तस्किन अहमद, तनझिम हसन साकिब आणि मुस्तफिजुर रहमान.