टीम इंडिया विरुद्ध बांगलादेश यांच्यातील कानपूरमधील दुसऱ्या कसोटीतील दुसऱ्या दिवसाचा खेळ पावसामुळे वाया गेला आहे. बीसीसीआयने सततच्या पावसामुळे दुसऱ्या दिवसाचा खेळ रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. कानपूरमध्ये सामन्याच्या पहिल्या दिवसापासून पावसाचा दबदबा पाहायला मिळतोय. याच पावसामुळे पहिल्या दिवशीही अवघ्या 35 षटकांचाच खेळ होऊ शकला. तर आता दुसऱ्या दिवसाचा संपूर्ण खेळ वाया गेला आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांच्या पदरी निराशा पडली आहे. तसेच आता या पावसामुळे दुसरा सामना हा रद्द केला जाऊ शकतो. त्यामुळे टीम इंडियाची बांगलादेशला 2-0 ने क्लीन स्वीप करण्याची संधी हुकण्याची शक्यता अधिक आहे.
पहिल्या दिवशी सामन्याला 1 तासाच्या विलंबाने सुरुवात झाली. सामना सकाळी साडे नऊऐवजी साडे दहाला सुरु झाला. पहिल्या सत्रात पावसाने खोडा घातला. त्यानंतर दुसऱ्या सत्रात अंधुक प्रकाश आणि पावासान खोडा घातला. त्यामुळे बीसीसीआयने खेळ थांबवण्याचा निर्णय घेतला. पहिल्या दिवशी फक्त 40 टक्केच खेळ होऊ शकला. त्यामुळे 60 टक्के खेळ वाया गेला. नियमांनुसार कसोटी क्रिकेटमधील एका दिवसात 90 षटकांचाच खेळ होतो. मात्र पावसामुळे 35 षटकांचा खेळ झाला. बांगलादेशने 30 ओव्हरमध्ये 3 विकेट्स गमावून 107 धावा केल्या.
दुसऱ्या दिवशी सामन्याला सकाळी 9 पासून सुरुवात होणं अपेक्षित होतं. मात्र त्याआधीच वरुणराजा बरसत होता. दोन्ही संघांना आणि क्रिकेट चाहत्यांना पाऊस कधी थांबतोय? याची प्रतिक्षा होती. मात्र पाऊस काही थांबेना. पाऊस थांबल्यानंतर ग्राउंड स्टाफने मैदान कोरडं करण्यासाठी जीवाचं रान केलं. त्या दरम्यान अधूनमधून पावसाची रिपरिप सुरुच होती. त्यामुळे मैदान कोरडं करणं आव्हानात्मक ठरत गेलं. मात्र त्यानंतरही प्रयत्न सुरुच होते. मात्र एकूण परिस्थितीचा अंदाज घेऊन अखेर 2 वाजून 7 मिनिटांनी बीसीसीआयने आजचा खेळ रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आता तिसऱ्या दिवशी तरी खेळ होणार का? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
दुसऱ्या दिवसाचा गेम पावसामुळे ओव्हर
Update from Kanpur 🚨
Play has been called off for Day 2 due to rains.#TeamIndia | #INDvBAN | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/HD98D6LK9K
— BCCI (@BCCI) September 28, 2024
टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), केएल राहुल, रवींद्र जडेजा, रवीचंद्रन अश्विन, आकाश दीप, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.
बांगलादेश प्लेइंग इलेव्हन : नजमुल हुसेन शांतो (कॅप्टन), शादमान इस्लाम, झाकीर हसन, मोमिनुल हक, मुशफिकुर रहीम, शकीब अल हसन, लिटन दास (विकेटकीपर), मेहदी हसन मिराझ, तैजुल इस्लाम, हसन महमूद आणि खालेद अहमद