टीम इंडिया आणि बांगलादेश टी 20I मालिकेतील तिसरा आणि अंतिम सामना खेळण्यासाठी सज्ज आहेत. टीम इंडिया या मालिकेत 2-0 अशा एकतर्फी फरकाने आघाडीवर आहे. अशात टीम इंडियाचा तिसरा सामना जिंकून बांगलादेशला क्लीन स्वीप करण्याचा मानस असणार आहे. तर दुसऱ्या बाजूला बांगलादेश भारत दौऱ्याचा शेवट विजयाने करण्याच्या प्रयत्नाने मैदानात उतरणार आहे. या तिसऱ्या सामन्याला भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे. हैदराबादमधील या सामन्याने एक दिग्गज ऑलराउंडर टी 20I क्रिकेटला कायमचा अलविदा करणार आहे. तो खेळाडू कोण आहे? आपण जाणून घेऊयात.
बांगलादेशचा दिग्गज आणि अनुभवी अष्टपैलू महमूदुल्लाह याचा हैदराबाद येथील राजीव गांधी स्टेडियममधील अखेरचा टी 20I सामना असणार आहे. या सामन्यानंतर महमूदुल्लाह टी 20I क्रिकेटमधून निवृत्त होणार आहे. महमूदुल्लाह याने याबाबतची घोषणा ही दुसऱ्या टी 20I सामन्याच्या पूर्वसंध्येला अर्थात 8 ऑक्टोबर केली होती. त्यामुळे आता बांगलादेश टीमचा महमूदुल्लाहला विजयाने निरोप देण्याचा प्रयत्न असणार आहे. बांगलादेशला या प्रयत्नात किती यश मिळतं? याकडेही साऱ्यांचंच लक्ष असणार आहे.
महमूदुल्लाह याने याआधीच कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. तर एकदिवसीय क्रिकेटकडे अधिक लक्ष आणि वेळ देण्यासाठी आपण टी 20Iमधून निवृत्त होत असल्याचं स्पष्ट केलं होतं. त्यामुळे आता महमूदुल्लाह आपल्या अखेरच्या टी20I सामन्यात कशी कामगिरी करतो? याकडे साऱ्यांचंच लक्ष असणार आहे.
टीम इंडिया : सूर्यकुमार यादव (कर्णधार), संजू सॅमसन (विकेटकीपर), अभिषेक शर्मा, नितीश रेड्डी, हार्दिक पंड्या, रियान पराग, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग, मयंक यादव, जितेश शर्मा, तिलक वर्मा, रवी बिश्नोई आणि हर्षित राणा.
बांगलादेश क्रिकेट टीम : नजमुल हुसेन शांतो (कॅप्टन), परवेझ हुसेन इमॉन, लिटन दास (विकेटकीपर), तॉहीद हृदोय, महमुदुल्ला, जाकेर अली, मेहिदी हसन मिराज, रिशाद हुसेन, तस्किन अहमद, शॉरीफुल इस्लाम, मुस्तफिजुर रहमान, महेदी हसन, तनजीद हसन, रकीबुल हसन आणि तंजीम हसन साकिब.