टीम इंडिया विरुद्ध बांगलादेश यांच्यातील टी 20I मालिकेतील तिसरा आणि अंतिम सामना हा हैदराबादमधील राजीव गांधी स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला आहे. या सामन्याला भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे. त्याआधी 6 वाजून 30 मिनिटांनी टॉस झाला आहे. टीम इंडियाने टॉस जिंकला आहे. कॅप्टन सूर्यकुमार यादव याने बॅटिंगचा निर्णय केला आहे. टीम इंडियाने या सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हनमध्ये 1 तर बांगलादेशने 2 बदल केले आहेत. तसेच एका दिग्गजाचा हा अखेरचा टी20i सामना आहे.
टीम इंडियाने अर्शदीप सिंह याच्या जागी रवी बिश्नोई याचा समावेश केला आहे. टीम इंडियात या अंतिम सामन्यासाठी हर्षित राणा याला पदार्पणाची संधी दिली जाणार असल्याची चर्चा होती. मात्र हर्षित तब्येत बरोबर नसल्याने निवडीसाठी उपलब्ध नसल्याची माहिती बीसीसीआयने दिली. त्यामुळे हर्षितला पदार्पणासाठी पुढील टी20i मालिकेपर्यंत प्रतिक्षा करावी लागणार आहे. तर मेहदी हसन मिराझ आणि झाकेर अली या दोघांच्या जागी मेहदी हसन आणि तांझीद हसन तमीम या दोघांचा समावेश करण्यात आला आहे.
बांगलादेशचा अनुभवी ऑलराउंडर महमुदुल्लाह याचा हा शेवटचा टी20i सामना आहे. महमुदुल्लाह याने दुसऱ्या टी 20i सामन्याआधी 8 ऑक्टोबरला निवृत्त होणार असल्याचं जाहीर केलं होतं. एकदिवसीय क्रिकेटकडे अधिक लक्ष केंद्रीत करण्यासाठी आपण हा निर्णय घेत असल्याचं महमुदुल्लाह याने सांगितलं. त्यामुळे महमुदुल्लाह याचा आता जाता जाता अविस्मरणीय खेळी करण्याचा प्रयत्न असणार आहे. यात त्याला किती यश मिळतं? याकडे साऱ्यांचंच लक्ष असणार आहे.
टीम इंडिया या मालिकेत 2-0 ने आघाडीवर आहे. त्यामुळे टीम इंडियाकडे बांगलादेशला तिसऱ्या सामन्यात धुव्वा उडवून क्लीन स्वीप करण्याची संधी आहे. आता यात टीम इंडिया यशस्वी होणार की बांगलादेश या भारत दौऱ्याची विजयी सांगता करणार? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
टीम इंडिया विरुद्ध बांगलादेश यांच्यात एकूण 16 टी20i सामने खेळवण्यात आले आहेत. भारताने त्यापैकी 15 सामन्यात विजय मिळवला आहे. तर बांगलादेशला फक्त एकदाच जिंकता आलं आहे.
बांगलादेश प्लेइंग ईलेव्हन : नजमुल हुसेन शांतो (कॅप्टन), परवेझ हुसेन इमान, लिटन दास (विकेटकीपर), तन्झिद हसन, तॉहिद हृदॉय, महमुदुल्ला, महेदी हसन, तस्किन अहमद, रिशाद हुसेन, मुस्तफिजुर रहमान आणि तांझिम हसन साकिब.
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : सूर्यकुमार यादव (कर्णधार), संजू सॅमसन (विकेटकीपर), अभिषेक शर्मा, नितीश रेड्डी, हार्दिक पांड्या, रियान पराग, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई आणि मयंक यादव.