टीम इंडियाचा युवा विकेटकीपर बॅट्समन ऋतुराज गायकवाड याला बांगालदेश विरूद्धच्या 3 सामन्यांच्या मालिकेत संधी न दिल्याने क्रिकेट चाहत्यांना आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. बीसीसीआयने या टी 20i मालिकेसाठी शनिवारी 28 सप्टेंबर रोजी रात्री 15 सदस्यीय संघ जाहीर केला. या संघात ऋतुराजचं नाव नसल्यानं बीसीसीआय त्याच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचंही म्हटलं जात आहे. सध्या टीम इंडिया मायदेशात बांगालादेश विरुद्ध कानपूरमध्ये कसोटी मालिकेतील दुसरा आणि अंतिम सामना खेळत आहे. त्यानंतर टीम इंडिया 6 ते 12 ऑक्टोबर दरम्यान बांगलादेश विरुद्ध टी 20i मालिका खेळणार आहे.
ऋतुराजला बांगलादेश विरूद्धच्या टी 20i मालिकेत बीसीसीआयकडून संधी न देण्याचं आधीच ठरलेलं, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. ऋतुराजला संधी न देण्यामागचं कारणही आपण जाणून घेऊयात. ईराणी ट्रॉफी स्पर्धेत मुंबई विरुद्ध रेस्ट ऑफ इंडिया यांच्यात 1 ते 5ऑक्टोबर दरम्यान सामना होणार आहे. हा सामना लखनऊ येथील भारतरत्न श्री अटलबिहारी वाजपेयी एकाना स्टेडियममध्ये होणार आहे. बीसीसीआयने इराणी ट्रॉफीसाठी 4 दिवसांआधी 24 सप्टेंबरला संघ जाहीर केला. बीसीसीआयने ऋतुराजला या इराणी ट्रॉफीत रेस्ट ऑफ इंडियाचं कर्णधारपद दिलं. तर 6 ऑक्टोबरला टी 20i मालिकेतील सलामीचा सामना हा ग्वाल्हेर येथे होणार आहे.
आता ऋतुराजची निवड झाली असती तरी त्याला पहिल्या सामन्यासाठी इराणी ट्रॉफीतील सामन्याच्या दुसऱ्याच दिवशी लखनऊ वरुन ग्वाल्हेरला जावं लागलं असतं. लखनऊ ते ग्वाल्हेर यातील अंतर हे 338.5 किमी इतकं आहे. या प्रवासासाठी साडे सहा तासांचा वेळ अपेक्षित आहे. इतक्या प्रवासानंतर दुसऱ्या दिवशी खेळणं हे खेळाडूंसाठी आव्हानात्मक ठरतं. त्यामुळे ऋतुराजचं पहिल्या सामन्यात नसणार असल्याचं तेव्हाच स्पष्ट झालं होतं, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही.
निवड समितीने ठरवलं असतं तर ऋतुराजला शेवटच्या 2 सामन्यात संधी देता आली असती. बीसीसीआय पहिल्या सामन्यासाठी आणि उर्वरित 2 मॅचसाठी असं संघ जाहीर करु शकली असती. मात्र बीसीसीआयने तसं न करता एकदाच संघ जाहीर केला. त्यामुळे ऋतुराजला संधी न दिल्याने नेटकऱ्यांनी सोशल मीडियावरुन निवड समितीवर टीका केली आहे.
पहिला सामना, 6 ऑक्टोबर, ग्वाल्हेर
दुसरा सामना, 9 ऑक्टोबर, नवी दिल्ली
तिसरा सामना, 12 ऑक्टोबर, हैदराबाद
तिन्ही सामन्यांना संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होईल.
बांगलादेश विरूद्धच्या टी 20I मालिकेसाठी टीम इंडिया : सूर्यकुमार यादव (कॅप्टन), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), रिंकू सिंग, हार्दिक पंड्या, रियान पराग, नितीश कुमार रेड्डी, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, वरुण चक्रवर्ती, जितेश शर्मा (विकेटकीपर), अर्शदीप सिंग, हर्षित राणा आणि मयंक यादव.